सातारा : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टर व आरोपी पीएसआय गोपाळ बदने यांच्यात जानेवारी ते मार्च या कालावधीत संभाषण झाले. पण त्यानंतर त्यांच्यात कोणतेही संभाषण झाले नाही. पण आत्महत्येच्या दिवशी त्यांचा आरोपी प्रशांत बनकर यांच्याशी फोटोवरून वाद झाला होता, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आज दिली. त्यांच्या या माहितीनंतर या प्रकरणाला एक नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आज फलटण उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणाची माहिती घेतली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी या प्रकरणावर विस्तृत भाष्य केले. त्या म्हणाल्या, घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. यामध्ये पोलिस, प्रशासकीय विभाग व आयसी समिती (अंतर्गत तक्रार समिती) यांच्याशी विस्तृत चर्चा केली. त्यात अनेक गोष्टी समोर आल्या. महिला आयोग प्राधान्यक्रमाने शासकीय, निमशासकीय व खासगी आस्थापनांत आयसी समिती अस्तित्वात आहे की नाही? हे तपासून पाहते. या समित्या केवळ अस्तित्वात असून चालणार नाही, त्या सक्रीय असल्या पाहिजेत. कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी तथा महिलांना सुरक्षितता मिळण्यासाठी ही समिती अत्यंत महत्त्वाची आहे.

त्या पुढे म्हणाल्या, फलटण उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य विभागाची आयसी समिती कार्यरत आहे. पण संबंधित डॉक्टरने कोणतीही तक्रार या समितीकडे केली नव्हती. त्यांची तक्रार डॉक्टरांची पोलिसांविरोधात व पोलिसांची डॉक्टरांविरोधात आहे. या प्रकरणी एक चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीच्या अनुषंगाने ही केस 23 ऑगस्ट 2025 रोजी निकाली काढली गेली होती. या प्रकरणी पोलिसांची तक्रार फीट व अनफिटचा रिपोर्ट देण्यात दिरंगाई करण्याशी संबंधित होती. तर डॉक्टरने पोलिसांनी आरोपींना रात्री नव्हे तर दिवसा कामाच्या वेळातच तपासणीसाठी आणण्याचा आग्रह धरला होता.








