सोलापूर : अखिल भारतीय कुलगुरू चषक क्रिकेट टी-ट्वेंटी स्पर्धेसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा संघ हिसार, हरियाणा येथे सोमवारी रवाना झाला. कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांनी संघाला स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धा दि. 5 ते 15 नोव्हेंबर 2025 या कालावधीत लाला लजपतराय युनिव्हर्सिटी ऑफ वेटरनरी अँड ऍनिमल सायन्स हिसार, हरियाणा येथे होणार आहेत. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर व प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव तथा क्रीडा विभागाचे संचालक डॉ. अतुल लकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील टीम स्पर्धेसाठी हिसारला रवाना झाला आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या क्रिकेट संघात ज्ञानेश्वर भोई हे कर्णधार, उपकर्णधार म्हणून अनिल संभारम, व खेळाडू म्हणून डॉ. उमराव मेटकरी, सुनील थोरात, मुक्तार शेख, हनुमंत लोखंडे, श्रीशैल देशमुख, महादेव वलेकर, राजकुमार सले, लक्ष्मण चिक्का, अमोल गायकवाड, विनोद बंडगर आणि अतुल दाईंगडे यांची निवड झाली आहे. प्रशिक्षक म्हणून गजानन काशीद तर व्यवस्थापक म्हणून प्रशांत पुजारी यांची निवड झाली आहे.
अखिल भारतीय स्तरावर या स्पर्धा दरवर्षी होत असतात. विद्यापीठ अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी या स्पर्धेचे खास आयोजन होत असते. विद्यापीठ अधिकारी व कर्मचारी यांच्यात खेळाविषयी गोडी असावी, शारीरिक तंदुरुस्त तसेच चांगली मानसिकता राहण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले जाते. सर्व विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यात सहभागी होतात.







