सोलापूर: महसूल विभागात भ्रष्टाचाराचे लोण किती खोलवर पसरले आहे, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. मोहोळ तालुक्यातील वाफळे येथील तलाठ्याने जप्त केलेले ट्रॅक्टर सोडण्यासाठी आणि कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी मागितलेली १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले. सुदर्शन रमेश जाधव (वय ३० वर्षे) असे या लाचखोर तलाठ्याचे नाव असून, या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार आणि त्यांचे इतर दोन ट्रॅक्टर चालक मित्र वाफळे गावच्या हद्दीतून ट्रॅक्टरने मुरूम वाहतूक करत होते. २७ मार्च २०२६ रोजी तलाठी सुदर्शन जाधव यांनी हे ट्रॅक्टर पकडले होते. या ट्रॅक्टरवर दंडात्मक किंवा कायदेशीर कारवाई न करण्यासाठी आणि ते सोडून देण्यासाठी जाधव याने तिन्ही ट्रॅक्टर मालकांकडे प्रत्येकी ३३,००० रुपये प्रमाणे एकूण ९९,००० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.तक्रारदार यांच्या दोन मित्रांनी प्रत्येकी ३३,००० रुपये याप्रमाणे ६६,००० रुपये तलाठ्याला दिले होते. मात्र, तक्रारदार राजकिरण सावंत यांच्याकडे केवळ २३,००० रुपये उपलब्ध असल्याने त्यांनी तेवढी रक्कम दिली होती. उर्वरित १०,००० रुपये देणे अद्याप बाकी होते. ही उर्वरित रक्कम दिल्याशिवाय काम पूर्ण होणार नाही, अशी भूमिका तलाठ्याने घेतली होती.वारंवार होणाऱ्या पैशांच्या मागणीला कंटाळून तक्रारदार यांनी सोलापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली आणि रीतसर तक्रार नोंदवली.
या तक्रारीची दखल घेत एसीबीच्या पथकाने २८ मार्च २०२६ रोजी पडताळणी केली. पडताळणी दरम्यान तलाठी सुदर्शन जाधव याने स्वतःसाठी आणि आपल्या वरिष्ठांसाठी १०,००० रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.त्यानुसार, सोलापूर ग्रामीणमधील मोहोळ परिसरात सापळा रचण्यात आला. तक्रारदार यांच्याकडून १०,००० रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना सुदर्शन जाधव याला एसीबीच्या पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले. याप्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ आणि ७(अ) नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील, पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र लांभाते व त्यांच्या पथकाने केली.










