सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गटाने पक्षात शिस्त आणि आंतरिक समन्वय राखण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या दोन प्रमुख प्रवक्त्यांना, रुपाली पाटील ठोंबरे आणि अमोल मिटकरी यांना त्यांच्या पदावरून मुक्त करण्यात आलं आहे. पक्षाने नव्या 17 प्रवक्त्यांची यादी जाहीर केली असून, त्यात या दोघांची नावे दिसत नाहीत.
रुपाली पाटील ठोंबरे यांना हटवण्यामागचं मुख्य कारण म्हणजे त्यांनी पक्षाच्या महिला नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर सातत्याने केलेली टीका. फलटण येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणात ठोंबरे यांनी महिला आयोगावर दुर्लक्ष केल्याचा आरोप केला होता. त्यावरून त्यांनी चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आणि पुण्यात आंदोलनही केलं होतं.
प्रवक्तेपदावरून हटवण्यात आलेले दुसरे नाव म्हणजे अमोल मिटकरी, जे पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषद सदस्य आहेत. त्यांच्याबाबत अधिकृत कारण स्पष्ट झालेलं नसले तरी, गेल्या काही दिवसांतील त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे पक्षाची प्रतिमा धोक्यात आली असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळेच नव्या यादीत मिटकरी यांना स्थान देण्यात आलं नाही.
अजित पवार गटाने जाहीर केलेल्या नव्या प्रवक्त्यांच्या यादीत हेमलता पाटील, प्रतिभा शिंदे यांच्यासह आणखी 15 नवी नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. या नव्या नियुक्त्यांमधून पक्षाने शिस्त, संघटनशक्ती आणि माध्यमांवरील वक्तव्यांवर नियंत्रण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केल्याचं दिसत आहे.







