सोलापूर : मंद्रूप येथील ग्रामदैवत श्री मळसिध्द यात्रेनिमित्त १२ ते १४ जानेवारी २०२६ दरम्यान प्रथमच आयोजित केलेल्या तीन दिवसीय कृषी प्रदर्शनासाठी बुधवारी तीन एकर जागा निश्चित करण्यात आली. या ठिकाणी भव्य स्वरूपात कृषी प्रदर्शन संपन्न करण्याचा निर्धार यात्रा कमिटीने घेतला आहे.मंद्रुप येथील श्री मळसिध्द यात्रा दरवर्षी १२ ते १६ जानेवारी असे पाच दिवस संपन्न होते. या पाच दिवस विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
यावर्षीपासून श्री मळसिध्द यात्रेनिमित्त तीन दिवस शेतकरी बांधवांसाठी कृषी प्रदर्शनाचे आयोजन करावेत अशी सूचना नियोजन बैठकीत मांडण्यात आली होती.
यात्रा कमिटीचे अध्यक्ष अॅड. राजेश देशमुख यांनी या सूचनाचे स्वागत करून यंदा मंद्रूपमध्ये तीन दिवस कृषी प्रदर्शन भरविण्याचे जाहीर केले.दि. १२, १३ आणि १४ जानेवारी २०२६ रोजी सलग तीन दिवस मंद्रुप येथील निंबर्गी रस्त्यावरील कै. महादेव म्हेत्रे मैदानावर कृषी प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. यावेळी यात्रा कमिटीचे अध्यक्ष देशमुख व सर्व पदाधिकारी आणि मानकरी यांनी मैदानाला भेट देऊन कृषी प्रदर्शनासाठी तीन एकर जागेवर भव्य मंडप, विविध कंपन्यांसाठी स्टॉल, पाणी, वीज या तयारीसाठी आवश्यक असणाऱ्या बाबीची पाहणी केली.










