आमदार सुभाष देशमुखांच्या उपस्थितीत बोरुळमध्ये सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात संपन्न
सोलापूर ; बोरुळ गावात एकूण 80 कुटुंबे असून त्यापैकी 45 कुटुंबांतील मुला-मुलींचे सामुदायिक विवाह झाले आहेत. त्यामुळे बोरुळ गाव सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी एक आदर्श मॉडेल ठरल्याचे प्रतिपादन आ. सुभाष देशमुख यांनी केले.दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरुळ येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त लोकमंगल फाउंडेशनच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यास फाउंडेशनचे संस्थापक आमदार सुभाष देशमुख स्वतः उपस्थित राहून नवदांपत्यांना आशीर्वाद दिले व विवाह विधी पार पाडले. या वेळी हजारो वर्हाडी मंडळींची उपस्थिती होती. बोरुळ गावात लोकमंगल फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेला हा सलग चौथा सामुदायिक विवाह सोहळा ठरला. आमदार देशमुख यांनी ज्या गावात पाच किंवा त्यापेक्षा अधिक विवाह निश्चित होतील, त्या गावात सामुदायिक विवाह आयोजित करण्याचा संकल्प केला असून, त्याच अनुषंगाने बोरुळमध्ये दरवर्षी हा उपक्रम राबविला जात आहे.
यंदाच्या सोहळ्यात सात जोडपी विवाहबद्ध झाली. आमदार सुभाष देशमुख यांनी स्वतः कन्यादान करत नवदांपत्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी वधू-वरांना कपडे व संसारोपयोगी साहित्य, बूट चप्पल,सुवर्ण मनी, मंगळसूत्र,चांदीची जोडवी भेट म्हणून देण्यात आले. सनई-चौघड्यांच्या निनादात आणि उत्साही वातावरणात हा विवाह सोहळा पार पडला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अतुल गायकवाड, पंचायत समिती सदस्य पंचप्पा धनशेट्टी, होटगी पंचायत समिती सदस्या अंबिका पाटील, उत्तरचे तालुकाध्यक्ष राम जाधव, लोकमंगल फाउंडेशनचे संचालक मारुती तोडकर, उत्तम शिंदे, घोडके, मुख्याध्यापक तेगीनकेरी, द्राक्ष बागायतदार गुरुबसप्पा म्हेत्र, राहुल वंजारे, सागर धुळवे, शिवानंद पुजारी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.










