नागपूर : माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात शेतकरी कर्जमाफीसाठी राज्याची उपराजधानी नागपुरात सुरू करण्यात आलेले आंदोलन आज सलग तिसऱ्या दिवशीही सुरू आहे. राज्य सरकारचे शिष्टमंडळ तथा आंदोलकांशी बुधवारी रात्री दीड तास चर्चा झाली. पण त्यात कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे आज पुन्हा मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा होणार आहे. या बैठकीत कर्जमाफीची तारीख ठरली नाही, तर 31 ऑक्टोबर रोजी रेल्वे करण्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. दरम्यान, मनोज जरांगे यांनी बच्चू कडू यांची आंदोलनास्थळी जाऊन भेट घेतली आहे.
यासंबंधीच्या माहितीनुसार, राज्यमंत्री पंकज भोयर व राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी बुधवारी रात्री 8.30 च्या सुमारास नागपुरातील आंदोलनस्थळी जाऊन आंदोलकांशी चर्चा केली. हे शिष्टमंडळ आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी सायंकाळी 4 वा. येणार होते. पण त्यांना येण्यास फार उशिरा झाला. यामुळे आंदोलकांनी त्यांना चांगलेच फैलावर घेतले. कर्जमाफी होणार असेल तरच चर्चेला अर्थ आहे, अन्यथा नाही अशी त्यांनी भूमिका घेतली. पण नंतर त्यांचा संतप्त सूर मावळला. अखेर शिष्टमंडळ व आंदोलक नेत्यांची चर्चा झाली. त्यात शिष्टमंडळाने बच्चू कडू यांची मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा करून दिली. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांचे चर्चेचे निमंत्रण स्वीकारले. पण सोबतच रस्ते मोकळे करून नियोजित ठिकाणी आंदोलन सुरू राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
हायकोर्टाने घेतली स्वतःहून दखल
दुसरीकडे, उच्च न्यायालयाने या आंदोलनाप्रकरणी स्वतःहून याचिका दाखल करून घेत बुधवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंत आंदोलकांना महामार्गावरून हटवण्याचे निर्देश नागपूर पोलिसांना दिले. हा आदेश घेऊन पोलिस आंदोलनस्थळी पोहोचले. पण आंदोलकांनी मागण्या पूर्ण होईपर्यंत रस्ते सोडणार नसल्याची भूमिका घेतली. यामुळे त्यांना आल्या पावली परत जावे लागले. परिणामी, वातावरण काहीसे तंग झाले होते.







