सोलापूर: नवनिर्मिती, आधुनिक तंत्रज्ञान आणि भविष्यातील अभियंत्यांचा गौरव या उद्देशाने केगाव येथील भारत रत्न इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग (BIGCE) तर्फे आयोजित ‘टेक्नोक्रेस्ट २K-२६’ (Technokrest 2K-26) या राष्ट्रीय स्तरावरील भव्य तांत्रिक महोत्सवाचा शनिवारी, ७ मार्च रोजी उत्साहात प्रारंभ झाला.
या महोत्सवाचे उद्घाटन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, संभाजीनगर येथील देवगिरी इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. उल्हास शिरूरकर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे प्रमुख डॉ. शिवाजी कराड यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना आणि त्यांच्या तांत्रिक कौशल्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे. यावेळी बोलताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. त्यांनी प्रदर्शनातील विविध तांत्रिक प्रकल्पांची पाहणी करून माहिती घेतली आणि भावी अभियंत्यांना मार्गदर्शन करताना तंत्रज्ञानातील बदलांशी जुळवून घेण्याचे आवाहन केले.
या सोहळ्याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र गायकवाड, प्राचार्य अनिल देशमाने, प्रा. विजय कोळकुरे, प्रा. अझरुद्दीन पेरमपल्ली, प्रा. अमित वडवेराव, प्रा. शेखर धनावळे, प्रा. प्रभाकर ढवळे, प्रा. सुरेश मठपती, प्रा. राजकुमार तेली यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.या महोत्सवातून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला चालना मिळत असून, विविध तांत्रिक स्पर्धांमुळे शैक्षणिक वातावरणात नवा उत्साह पाहायला मीळाला..










