सोलापूर : प्रभाग क्रमांक 22 मधून महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून इच्छुक असलेले शीतल गायकवाड व प्रभाग क्रमांक 23 मधून इच्छुक असलेले अंबादास जाधव या निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत पक्षाकडून आपल्याला न्याय न मिळाल्यास भाजपा पक्ष कार्यालयासमोर हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आत्मदहन करण्याचा इशारा पत्रकार परिषदेत दिला आहे.
विजापूर रोड परिसरातील प्रभाग क्रमांक २२ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीवरून निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. हा प्रभाग पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात असताना, मागील अनेक वर्षांत आम्ही कार्यकर्त्यांनी प्रचंड संघर्ष करून पक्षाचे मजबूत संघटन उभे केले आहे. मात्र, आज आम्हा निष्ठावंत कार्यकर्त्यांनाच डावलले जात असल्याचा आरोप भाजपचे इच्छुक उमेदवार शीतल गायकवाड यांनी केला.
याबाबत गायकवाड म्हणाले की, प्रभाग क्रमांक २२ मध्ये भाजपच्या प्रचारासाठी आम्ही कार्यकर्त्यांनी घराघरात जाऊन लोकांची संपर्क साधला. शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आल्या आहेत. याशिवाय मोठ्या प्रमाणावर सभासद नोंदणी करून झोपडपट्टी भागात प्रथमच भाजपचा झेंडा पोहोचवण्याचे काम आम्ही कार्यकर्त्यांनी केले आहे. काही दिवसांपूर्वी हॉटेल बालाजी सरोवर येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारगटातील किसन जाधव व नागेश गायकवाड या नेत्यांचा अचानक भाजपमध्ये प्रवेश झाल्याने आम्हा निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. निर्धार मेळाव्यात नवीन पक्षप्रवेश न घेता निष्ठावंत कार्यकर्त्यांनाच संधी देण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार आ. सुभाष देशमुख यांनी आपली उमेदवारी देखील मेळाव्यात जाहीर केली होती.
परंतु ऐनवेळी आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या किसन जाधव व नागेश गायकवाड यांना उमेदवारी देण्याचा घाट घातला जात आहे. भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने या प्रकरणात हस्तक्षेप करून निष्ठावंत, प्रामाणिक कार्यकर्त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे.
या पत्रकार परिषदेस अंबादास जाधव, कृष्णा उबाळे, रविकांत दुलंगे, अशोक राघमारे, इरण्णा हिरेमठ आदी भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.










