सोलापूर : सोलापुरात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून झालेल्या वादातून मनसेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. बाळासाहेब सरवदे यांच्या पार्थिवावर काल शोकाकुल वातावरणात आणि कडेकोट पोलिस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. आज मनसे नेते अमित ठाकरे यांनी सोलापूरचा दौरा करत सरवदे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. या भेटीनंतर अमित ठाकरे यांनी स्थानिक प्रशासनाकडून घटनेची माहिती घेत या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर अमित ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, तुमचे राजकारण काहीही असो, तुमचे बिनविरोध निवडून येवो. पण राजकारणासाठी कोणाचा जीव जाता कामा नये. मी या संदर्भात मुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती अमित ठाकरे यांनी दिली. यावेळी, ‘माझे पप्पा मला आणून द्या, माझ्या पप्पाला मी भेटलेच नाही, असा टाहो बाळासाहेब यांच्या चिमुकल्यांनी फोडला. तसेच सरवदे कुटुंबीयांनी देखील अमित ठाकरे यांच्यासमोर आक्रोश व्यक्त केला.
मृत बाळासाहेब सरवदे यांच्या पत्नी वंदना सरवदे यांनी यावेळी म्हटले की, येथील उमेदवार रेखा सरवदे यांना उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता. त्यातूनच येथे वाद झाला. यापूर्वी आमचे कोणतेही भांडण नव्हते. किरण देशमुख यांच्या सांगण्यावरून हे सगळे घडले आहे. सर्व आरोपीवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.











