सोलापूर : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून होम टू होम प्रचार सुरू असून आता १० जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सभेच्या घोषणेनंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सभेच्या यशस्वी आयोजनासाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरू असून, पदाधिकारी व कार्यकर्ते संघटनात्मक पातळीवर कामाला लागले आहेत.
मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणारी ही सभा राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. मुख्यमंत्री फडणवीस या सभेतून कोणते राजकीय संकेत देणार, विकासात्मक मुद्द्यांवर काय भूमिका मांडणार आणि निवडणूक रणनीतीबाबत कोणते संदेश देणार, याकडे केवळ भाजप पदाधिकारी व कार्यकर्तेच नव्हे तर सोलापूरकरांचेही लक्ष लागून राहिले आहे.
या सभेमुळे भाजपच्या प्रचाराला नवी ऊर्जा मिळण्याची शक्यता असून, आगामी मनपा निवडणुकीत ही सभा निर्णायक ठरण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.











