सोलापूर : अक्कलकोट, दुधनी आणि मैंदर्गी या तिन्ही नगर परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून भाजपच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार व सर्व नगरसेवक उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रविवार, ३० नोव्हेंबर रोजी अक्कलकोट येथे जाहीर सभा होणार असल्याची माहिती आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली.
मंगरुळे प्रशालेजवळील मैदानामध्ये सकाळी साडेदहा वाजता ही जाहीर सभा होणार आहे. अक्कलकोटमध्ये भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी मिलन कल्याणशेट्टी, मैंदर्गीमध्ये अंजली बाजारमठ आणि दुधनीमध्ये अतुल मेळकुंदे हे तीन उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्याशिवाय या तिन्ही नगरपालिकांमध्ये ६५ उमेदवार हे भाजपकडून नगरसेवक जागेसाठी आपले नशीब आजमावत आहेत. त्यादृष्टीने भाजपकडून ही मोठी जाहीर सभा होणार आहे. या सभेला पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते मंडळी प्रमुख उपस्थितीत राहणार असल्याची माहिती आ. कल्याणशेट्टी यांनी दिली.
भाजप ही निवडणूक केवळ विकासाच्या मुद्यांवर लढवत आहे. या तिन्ही नगरपालिकांमध्ये आम्हाला यश मिळेल. मागच्या वेळी या ठिकाणी भाजपचे वर्चस्व होते. ते यावेळी देखील कायम राहील, असा विश्वास आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केला. या सभेच्या अनुषंगाने तयारी सुरू झाली आहे. सभेला नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मंडल अध्यक्ष प्रदीप पाटील यांनी केले.







