सोलापूर: चेटीनाड आणि अल्ट्राटेक सिमेंट कंपनी परिसरातील रेल्वे गेट क्रमांक ६१ वारंवार बंद ठेवण्यात आले होते. सर्वसामान्यांना होत असलेल्या त्रासाबाबत दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या गंभीर प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी त्यांनी सोलापूरच्या रेल्वे मुख्य प्रबंधाकडे पत्राद्वारे निवेदन दिले .

२६ जानेवारी २०२६ रोजी भारताचा प्रजासत्ताक दिन असताना, सकाळी ध्वजारोहण कार्यक्रमासाठी शासकीय अधिकारी, कर्मचारी, शालेय विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडले होते. मात्र, सकाळी ६:४५ ते ७:३० या महत्त्वाच्या वेळेत चेटीनाड सिमेंट कंपनी आणि रेल्वे गेट क्रमांक ६१ बंद ठेवण्यात आले. यामुळे अनेक नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या नियोजित ध्वजारोहण कार्यक्रमाला वेळेवर पोहोचता आले नाही.

प्रजासत्ताक दिनासारख्या राष्ट्रीय उत्सवाच्या दिवशी गेट बंद ठेवून नागरिकांची अडवणूक करणे ही गंभीर बाब असल्याचे आमदारांनी म्हटले आहे. केवळ २६ जानेवारीच नव्हे, तर २५ जानेवारी रोजी देखील सायंकाळी ७:३० ते ८:३० या वेळेत हे गेट बंद होते. या भागात हा त्रास आता नित्याचाच झाला आहे. स्थानिक नागरिकांनी या त्रासाबाबत आमदारांकडे लेखी निवेदन देऊन दाद मागितली होती.
सिमेंट कंपन्यांच्या या गेटमुळे निर्माण होणारी वाहतुकीची कोंडी आणि नागरिकांचा त्रास कायमचा बंद व्हावा, यासाठी रेल्वे मुख्य प्रबंधाक आपल्या स्तरावरून तातडीने योग्य निर्णय घ्यावा आणि दक्षिण सोलापूरच्या जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी आमदार सुभाष देशमुख यांनी केली आहे.या पत्राच्या प्रती मुख्य रेल्वे प्रबंधक आणि संबंधित सिमेंट कंपन्यांच्या व्यवस्थापकांनाही माहितीसाठी पाठवण्यात आल्या आहेत.









