सोलापूर ; अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. त्यामुळे चक्रीवादळासाठी पोषक स्थिती निर्माण होत असल्याने ढगाळ हवामान तयार झाले आहे. परिणामी, किमान तापमान १९.५ अंश सेल्सिअसपर्यंत वाढल्याने थंडीचा प्रभाव पूर्णपणे कमी झाला आहे. पुढील ३ ते ४ दिवस अशीच स्थिती कायम राहील, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. शनिवारी कमाल तापमान ३०.८ तर किमान तापमान १९.५ अंश सेल्सिअस नोंदले गेले. गेल्या काही दिवसांपासून सोलापूरकरांना जाणवत असलेली हुडहुडी कमी झाली आहे.











