सोलापूर : शत-प्रतिशत भाजपचा नारा देत भाजपने सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळविला. यंदा भाजपने ‘अब की बार ७५’ चा नारा दिला होता. अपेक्षेपेक्षा जास्त चांगली कामगिरी करीत भाजपने स्वबळावर तब्बल ८७ जागांवर ऐतिहासिक यश मिळविले.मागील निवडणुकीत भाजपचे ४९ नगरसेवक निवडून आले होते.
यंदा मात्र या पक्षाने नवा इतिहास रचला. प्रथमच भाजपने १०२ जागेवर निवडणूक लढविली. यात ८७जागेवर दणदणीत विजय संपादन केला आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी महापालिका निवडणुकीची सूत्रे हाती घेऊन आ. सचिन कल्याणशेट्टी आणि आ. देवेंद्र कोठे यांच्या माध्यमातून अनेकांचा भाजप प्रवेश घडवून आणला.
यातूनच तीनही आमदार, पक्षांत प्रवेश केलेल्या दिग्गजांना सोबत घेत विरोधकांना धूळ चारली.शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या युतीला म्हणावा तसा करिष्मा करता आला नाही, तर काँग्रेसचा सुपडासाफ झाला.
एमआयएमला काही अंशी यश मिळाले असले तरी माकप, शरद पवारांची राष्ट्रवादी, ठाकरे शिवसेनेच्या उमेदवारांना मतदारांनी नाकारले. दिग्गज बंडखोरांचाही प्रभाव पडू शकला नाही. निकाल अनेक प्रस्थापित नेत्यांसाठी धक्कादायक ठरला आहे.महापालिकेच्या १०२ जागांसाठी अटीतटीची लढत झाली. या सर्व म्हणजे १०२ जागांवर एकट्या भाजपनेच उमेदवार दिले. अन्य पक्षांना सर्व ठिकाणी उमेदवारदेखील मिळाले नसल्याचे वास्तव आहे.
उमेदवार, कार्यकर्त्यांचा ‘जय श्रीराम’चा नारा, गुलाल उधळून केला जल्लोष मतमोजणीला सुरुवात झाल्यावर पहिल्या तासातच भाजपकडे अधिक कल दिसल्याने कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. विजयी उमेदवार, कार्यकर्ते यांनी गुलालाची उधळण करत, हवेत झेंडा फडकावित ‘जय श्रीराम’चा नारा देत जल्लोष केला.










