विजयपूर : जिल्ह्यातील सिंदगी तालुक्यातील रामपूर हद्दीत पोलिसांच्या गोळीबारात एक रेकॉर्डवरील गुन्हेगार ठार झाल्याची घटना घडली आहे. युनूस इक्लास पटेल (वय ३५) असे मृत आरोपीचे नाव आहे.युनूसने एका व्यक्तीस चाकू दाखवून त्याच्याकडून २५ हजार रुपये लुटले होते. त्यानंतर त्या व्यक्तीची स्कूटरही हिसकावून पळून गेला होता. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार आरोपी युनूस आपल्या मूळगावी, आलमेल तालुक्यातील देवनगावकडे निघाला होता, याची माहिती मिळताच पोलीस रामपूर परिसरात त्याला अटक करण्यासाठी पोहोचले. तेव्हा युनूसने पोलिसांवर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्याने दोन पोलीस शिपाई आणि पोलीस निरीक्षक प्रदीप तळकेरी यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या गोंधळात पोलीस निरीक्षक तळकेरी यांचा तोल गेला आणि ते खाली पडले. इशारा देण्यासाठी त्यांनी हवेत गोळी झाडली, पण युनूसने शरण येण्यास नकार दिल्यामुळे शेवटी तळकेरी यांनी त्याच्या पायावर गोळी झाडली. त्याच्यावर तात्काळ सिंदगी तालुका रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन नंतर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान युनूसचा मृत्यू झाला आहे. युनूसवर दोन खुनासह १२ गुन्हे दाखल होते. या घटनेची चौकशी केली जात असल्याची माहिती जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी दिली आहे.








