शिक्षक आमदार ही निवडणूक अपक्ष लढवणार…
सोलापूर : पाठीशी कोणताही पक्ष नाही, कोणत्याही सहकारी संस्था नाहीत, फक्त शिक्षक, शिक्षकांसाठी केलेलं काम, आणि उभा केलेली चळवळ याच्या बळावर पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी पुन्हा एखदा पुणे विभाग मतदारसंघ निवडणूकीची तयारी सुरू केली आहे. मतदारसंघातील शाळांना भेटी देत त्याठिकाणच्या शिक्षकांपर्यत मतदार नोंदणी फॉर्म त्यांच्याकडून पोहच करण्यात येत आहेत.

शिक्षक मतदार नोंदणीचे अभियान सुरू झाली असून, पुढच्या वर्षी पुणे विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक होणार आहे. त्यासाठी शिक्षकांना आधी मतदार होणे गरजेचे आहे. त्यासाठी पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सातारा व सांगली या पाचही जिल्ह्यात शिक्षकांची नोंदणी करण्याचे काम सुरू आहे. ७७ हजार १७६ शिक्षकांना मतदार नोंदणीचे फॉर्म वाटप केले असल्याचा दावा पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी केला आहे. पुणे विभाग शिक्षक मतदार संघ हा संपर्कासाठी भौगोलिक दृष्ट्या खूप मोठा असणारा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात एकूण ५८ तालुके येतात. ५८ तालुक्यात प्रत्येक गावात शाळा आहेत. या शाळांवरती जाऊन त्यांना मतदार नोंदणीचे फॉर्म देऊन, त्याबद्दल योग्य ते मार्गदर्शन सावंत यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे. पुणे विभाग शिक्षक मतदारसंघात उमेदवारीसाठी महायुती व महाविकास आघाडी दोन्हीकडून अनेक इच्छुकांची नावे समोर येत आहेत. अनेकांनी त्या दृष्टीने प्रयत्नही सुरू केले आहेत. महायुती व महाविकास आघाडीकडूनही उमेदवारी संदर्भात उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. माजी आमदार यांनीही आपली तयारी सुरू केली आहे









