सोलापूर : विजापूर रोड, रेवणसिद्धेश्वर मंदिर समोरील श्री दानम्मादेवी व वीरभद्रेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे आज रोजी सायंकाळी ७ वाजता दीपोत्सव होणार असल्याची माहिती, माजी आमदार शिवशरण पाटील यांनी पत्रकारांना दिली.
कार्तिक अमावास्याला श्री क्षेत्र गुड्डापूर येथे दानम्मा देवीची यात्रा असते. या अनुषंगाने दरवर्षी सोलापुरात हा दीपोत्सव केला जातो. यंदाचे २३ वे वर्ष आहे. गुरुवारी दानम्मादेवी मंदिर येथे दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम आहेत. पहाटे चार वाजता दानम्मादेवी मूर्तीस रुद्राभिषेक, पंचपल्लव अभिषेक व सहस्र बिल्वार्चन अलंकार पूजा. सकाळी साडेआठला भक्तांच्या हस्ते महामंगल आरती. सर्व वैदिक पूजा वेदमूर्ती सिद्धय्या हिरेमठ, वीरेश हिरेमठ, मल्लय्या हिरेमठ, सचिन मठपती करतील. सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत भक्तांच्या हस्ते चंडीहोम, कुंकूमार्चन ललित सहस्त्रनाम पठण, पूर्णाहुती होणार आहे. संध्याकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत बी. हेमंत कुमार यांचा कन्नड, मराठी व हिंदी भक्तिसंगीत गीतांचा संगीत रजनी कार्यक्रम.
संध्याकाळी ७वाजता हजारो भक्तांच्या उपस्थितीत श्री दानम्मा देवीची महाआरती झाल्यानंतर परमपूज्य १०८ ष.ब्र.शिवशंकर शिवाचार्य महास्वामी तोळनूर व परमपूज्य १०८ ष.ब्र. गुरुपादईश्वर शिवाचार्य महास्वामी हत्ताळी यांच्या हस्ते दीपप्रज्वलीत करून दीपोत्सवाचा शुभारंभ होईल. यानिमित दिवसभर सकाळी ८ ते रात्री ११ वाजेपर्यंत महाप्रसाद वाटप आहे. संध्याकाळी महास्वामींचे आशीर्वाचन होईल.याप्रसंगी मंदिर ट्रस्ट अध्यक्ष सिद्धेश्वर पाटील, सिद्धय्या हिरेमठ, शिवराया बुक्कानुरे, शाम धुरी मान्यवरांची उपस्थिती राहील.







