सोलापूर : पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शासन निर्णय आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करून पदाचा गैरवापर करत १८६० व्हीआयपी पासेस दिले असल्याचा आरोप करत याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सागर बडवे यांनी पत्रकार परिषदेत केली.
या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या पंढरपूर येथील आषाढी यात्रेदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कोणत्याही व्यक्तीस व्हीआयपी दर्शनास मज्जाव करण्यात आला होता. तरीही समितीतील पदाधिकारी आणि सदस्यांनी सुमारे १८६० व्हीआयपी पासेस दिले आहेत.

यामुळे सामान्य गोरगरीब भाविकांना दर्शनासाठी प्रतीक्षा करावी लागली. त्यांच्यावर अन्याय आणि भेदभाव झाला असल्याचा आरोप यावेळी मुकुंद बडवे आणि सागर बडवे (पंढरपूर) यांनी केला आहे. येणाऱ्या कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने संबंधितांवर कारवाई होणे गरजेचे आहे, अन्यथा अशा पद्धतीने बेकायदेशीररीत्या पासेस वाटप करण्यात येतील. यामुळे संबंधितांवर तत्काळ कठोर कारवाई करावी, असेही बडवे यांनी म्हटले आहे.







