सोलापूर : सोलापूरचे माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप हे वेगवेगळ्या कारणांनी नेहमीच चर्चेत असतात. अन्यायग्रस्त शिक्षकांना न्याय देण्यासाठी यापूर्वी त्यांनी शिक्षण संस्थांमध्ये जाऊन ठाण मांडल्याच्या घटना ताज्या आहेत. पगार नसल्याने एका शिक्षकाची पत्नी माहेरी निघून गेल्याचे कळताच चक्क माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी “त्याची शिक्षकाच्या सासर्याला कॉल केल्याची घटना गुरुवारी सकाळी माध्यमिक शिक्षण कार्यालयात घडली. त्यामुळे उपस्थितांबरोबरच त्या शिक्षकाला गहिवरून आले.
झाले असे गुरुवारी माध्यमिक शिक्षण विभागात नेहमीप्रमाणे गर्दी दिसून आली. माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप प्रत्येक कर्मचारी व शिक्षकांची भेट घेऊन त्यांची कैफियत ऐकून घेत होते. अशात एक शिक्षक आला व त्याने मला पगार नाही त्यामुळे पत्नी माहेरी निघून गेली आहे, अशी कैफियत मांडली. त्या शिक्षकाची समस्या ऐकून शिक्षणाधिकारी जगताप गंभीर झाले. त्यांनी त्याच्या हातातील फाईल घेऊन तपासून पाहिली. किती दिवस हेलपाटे मारत आहात अशी विचारणा केली. फाईल सबमिट करून बरेच दिवस झाले पण तुमची भेट होत नव्हती . असे त्या शिक्षकांने सांगितले. चला आजपासून मी तुमचा पगार सुरू करतो, तुमच्या सासर्यांना सांगा असे म्हणत त्यांनी फाईलवर सही केली. त्या शिक्षकाला आनंद झाला पण आता काय उपयोग? आमचा प्रश्न फार ताणला आहे, असे उत्तर दिले. लावा सासर्याला फोन असे म्हटल्यावर त्या शिक्षकांनी इकडे तिकडे पाहण्यास सुरुवात केली. सासरे माझा फोन घेणार नाहीत असे त्याने म्हणताच, सांगा नंबर असे म्हणत त्याने आपल्या मोबाईलवरून त्या शिक्षकाच्या सासर्याला कॉल केला. हॅलो.. पवार बोलताय ना. मी शिक्षणाधिकारी जगताप बोलतोय. प्रदीप मुटकुळे तुमचे जावई ना. आज पासून मी त्यांचा 100% पगार सुरू करतोय. त्यामुळे तुमच्या लेकीला आता तरी नांदायला पाठवा. अचानकपणे आलेल्या या कॉल मुळे पवार गोंधळले. काय बोलावे हे त्यांना सुचेना. हो.. हो… म्हणत त्यांनी कॉल कट केला. एकीकडे सरकारी पगारीच्या नोकरीचा आदेश देत असतानाच दुसरीकडे त्याच्या संसाराची विस्कटलेली घडी बसवण्यासाठी शिक्षण अधिकाऱ्यांनी स्वतः पीडित शिक्षकाच्या सासर्याला कॉल केल्यामुळे उपस्थितांमध्ये हा चर्चेचा विषय झाला.


प्रदीप मुटकुळे हे मूळचे कळमनचे. बीएससी बीएड पर्यंत शिक्षण झाल्यावर त्यांनी गावडी दारफळ येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री. छत्रपती विद्यालयात सहशिक्षकाची नोकरी पत्करली. शाळा विनाअनुदानित असल्याने त्यांना जेमतेम मानधन मिळत होते. ते कायम होतील या आशेने गावातीलच पवार यांनी त्यांना आपली मुलगी दिली. पण 22 वर्षे झाली तरी पगारीचा पत्ता नसल्यामुळे त्यांची पत्नी भांडून माहेरी गेली. त्यामुळे वैतागलेल्या मुटकुळे यांनी माध्यमिक शिक्षण अधिकारी सचिन जगताप यांची गुरुवारी भेट घेऊन आपली कैफियत मांडली. जगताप यांनी त्यांना न्याय दिल्यामुळे त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.

मुटकुळे हे गावडी दारफळ येथील श्री. छत्रपती विद्यालयात 13 जून 2006 पासून विनाअनुदानित तत्त्वावर काम करत होते. 15 ऑगस्ट 2009 रोजी त्यांना वैयक्तिक मान्यताही मिळाली होती. संस्थेने त्यांना शंभर टक्के अनुदान तुकडीवर 15 ऑक्टोबर 2024 रोजी बदलीचा प्रस्ताव दिला होता. शिक्षणाधिकारी जगताप यांनी हा प्रस्ताव मान्य करीत त्यांना बदलीच्या ठिकाणी नियुक्ती दिली आहे.







