१५ लाखांचा मुद्देमाल जप्त वळसंग पोलिसांची दमदार कारवाई..
सोलापूर: आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वळसंग पोलिसांनी अवैध धंद्यांविरुद्ध मोठी मोहीम उघडली आहे. मौजे मद्रे (ता. दक्षिण सोलापूर) येथील शिवारात सुरू असलेल्या एका बनावट देशी दारूच्या कारखान्यावर छापा टाकून पोलिसांनी सुमारे १५ लाख ४० हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. २४ जानेवारी रोजी वळसंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे व त्यांचे पथक मद्रे ते आहेरवाडी रोडवर गस्त घालत होते.

यावेळी मद्रे शिवारात राजू टिळेकर यांच्या पत्र्याच्या शेडजवळ एक आयशर टेम्पो संशयास्पदरीत्या उभा असलेला दिसला. पोलिसांनी तिथे धाड टाकली असता, ३ ते ४ इसम अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. तपासणी दरम्यान, त्या ठिकाणी कोणत्याही परवानगीशिवाय बनावट देशी दारू तयार करण्याचा कारखाना सुरू असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी या कारवाईत दारू बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ४ यंत्रांचा संच, २५० लिटरचे एकूण १२२ बॅरल कच्चे रसायन, टँगो पंच, रॉकेट, भिंगरी आणि कोकण प्रीमियम या ब्रँड्सचे बनावट लेबल लावलेले सुमारे १४०० बॉक्स, रिकाम्या बाटल्यांचे बॉक्स, बुचांच (झाकणांचे) बॉक्स आणि वाहतुकीसाठी वापरले जाणारे वाहन, जप्त केले.
या प्रकरणी कारखान्याचा मालक राजू उर्फ राजकुमार चंद्रकांत टिळेकर (रा. मद्रे) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यासोबतच भागीदारीत कारखाना चालवणारा दिनू शेठ उर्फ भूषण पाटील आणि टेम्पो चालक यांच्याविरुद्ध वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी तीन पथके रवाना केली आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार यांच्या सपोनि राहुल डोंगरे, पोसई रविराज कांबळे व त्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले..










