सोलापूर: सोलापूर महानगरपालिकेचे माजी परिवहन सभापती आणि शिवसेनेचे निष्ठावंत उपजिल्हाप्रमुख तुकाराम (नाना) मस्के यांचे आज कर्करोगासारख्या दुर्धर आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे सोलापूरच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
तुकाराम मस्के यांनी शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीत आयुष्यभर सक्रिय योगदान दिले. एक आक्रमक पण संयमी नेता म्हणून त्यांची ओळख होती. प्रदीर्घ काळ शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख म्हणून काम करताना त्यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना नेहमीच बळ दिले. महानगरपालिकेच्या परिवहन सभापती पदाच्या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले होते.
आज सायंकाळी अंत्यसंस्कार:
तुकाराम नाना मस्के यांच्या पार्थिवावर आज, मंगळवार दि. २४ मार्च रोजी सायंकाळी ७:३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांची अंत्ययात्रा निराळे वस्ती येथील त्यांच्या राहत्या घरापासून निघणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. त्यांच्या पश्चात मोठा आप्तपरिवार असून, सोलापूरमधील विविध पक्षांच्या नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.










