सोलापूर : नागपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या विधीमंडळ अधिवेशनात अवैध गौण खनिज उपसा प्रकरणी ४ तहसीलदार, ४ मंडळ अधिकारी व २ तलाठ्यांना थेट निलंबित करण्यात आले. मात्र कोणतीही सखोल चौकशी न करता करण्यात आलेली ही कारवाई अन्यायकारक असून कर्मचाऱ्यांचे मनोबल खच्चीकरण करणारी असल्याचा आरोप करत सोलापूर जिल्ह्यातील तब्बल दीड हजार महसूल कर्मचारी मंगळवारी सामूहिक रजेवर गेले.
या आंदोलनात तलाठी, महसूल कर्मचारी, कोतवाल संघटना, महसूल सहाय्यक संघटना तसेच तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनांचा सक्रिय सहभाग असून त्यामुळे नेहमी वर्दळीचे असणारे जिल्हाधिकारी कार्यालय दिवसभर ओस पडले होते.
महसूल कर्मचाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात बिगर महसूली कामांचा भार टाकला जातो. अवैध गौण खनिज वाहतुकीवर कारवाई करताना कोणतेही संरक्षण दिले जात नाही. अनेक वेळा हल्ल्याच्या घटनाही घडल्या आहेत. अशा परिस्थितीतही कर्मचारी प्रामाणिकपणे काम करत असताना चौकशी न करता थेट निलंबन करण्यात आल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

निलंबित तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठ्यांना सन्मानपूर्वक तात्काळ सेवेत पुनर्नियुक्त करावे, या मागणीसाठी पुणे विभागातील विविध जिल्ह्यांत आंदोलन तीव्र झाले असून, जोपर्यंत निलंबन मागे घेतले जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

यावेळी पांडुरंग हिप्परकर, प्रकाश जगताप, गणेश फडतरे, संतोष सुरवसे, विजय जाधव, संदीप चव्हाण संतोषकुमार देशमुख,अधिकारी महासंघ तसेच शंतनू गायकवाड, धैर्यशील जाधव, अमरनाथ भिंगे, लक्ष्मीकांत आयगोळे, रविराज नष्टे, गजानन गायकवाड, खंडू भोसले, यल्लाप्पा वरगंटी, रणजीत म्हेत्रे, गंगाधर हाके, समाधान राऊत, संदीप माने, अनिल पवार, कदम, अजित कांबळे, एफएम शेख, श्रीकांत घुगे प्रशांत गाडे केतन राचमाले, मुबीन कडेचूर, दरेप्पा बिराजदार, किरण क्षीरसागर, केरनाथ पारसी, सुशांत देशपांडे, सोमय्या स्वामी, सुहास म्हेत्रे, झारी, ज्ञानेश्वर कराळे, महेश निलंगे, वैभव मिसाळ,प्रताप काळेल हे सर्व पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







