सोलापूर: महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी श्री सिध्देश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यात विविध विषयांवर चर्चा झाली. महानगरपालिका निवडणुकीत सोबत राहण्याचा शब्द काडादी यांनी पालकमंत्री गोरे यांना दिला. यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुष्पराज काडादी, शरणराज काडादी यांची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री गोरे हे सोलापूर दौऱ्यावर असून शुक्रवारी त्यांनी काडादी यांच्या गंगा निवासस्थान येथे जाऊन त्यांची भेट घेतली. काडादी यांनी पालकमंत्री गोरे यांचे स्वागत केले. याप्रसंगी दोघांमध्ये ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्वर यात्रेबाबत तसेच महानगरपालिका निवडणुकीबाबत चर्चा झाली. श्री सिध्देश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष असलेल्या काडादी यांना मानणारा मोठा वर्ग आहे. या भेटीची चर्चा सध्या सुरू आहे. याप्रसंगी प्रभुराज मैंदर्गीकर, अक्षय अंजिखाने उपस्थित होते.











