शहरातील या नगरसेवकांचा झाला सन्मान..
सोलापूर : सोलापूरच्या जनतेने भरभरून विश्वास दाखवत ८७ नगरसेवक निवडून दिले आहेत. आता जनतेला दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करा, शहरातील रखडलेली विकासकामे मार्गी लावा आणि ही सर्व कामे पारदर्शक पध्दतीने करा, अशा सूचना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या.

सोमवारी, हॉटेल बालाजी सरोवर येथे महानगरपालिका निवडणुकीत मिळालेल्या ऐतिहासिक विजयानंतर नूतन नगरसेवकांचा सत्कार पालकमंत्री गोरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पालकमंत्री गोरे बोलत होते.ते म्हणाले, महानगरपालिका निवडणुकीत भाजपने विकासाचा ठोस दृष्टिकोन घेऊन प्रचार केला. कोणावरही टीका न करता केवळ विकासकामांवर भर दिला.

शहरातील प्रलंबित प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिल्यामुळेच जनतेने मोठ्या विश्वासाने मतदान केल्याचे त्यांनी सांगितले.प्रचारात सर्व उमेदवारांनी मोठी मेहनत घेतली. त्यामुळेच सर्व नगरसेवकांना एकत्र बोलावून स्नेहभोजन व सत्काराचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. सध्या कोणावर कोणती जबाबदारी द्यायची, हे ठरविलेले नाही.
महापौरपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर पुढील धोरण ठरविण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.यावेळी विरोधकांवर अप्रत्यक्ष टीका करताना गोरे म्हणाले, आम्ही दिल्लीत बसून प्रचार केला नाही, तर गल्लीबोळात फिरून जनतेशी संवाद साधला. विरोधक मात्र अजूनही आत्मपरीक्षण न करता पराभवानंतरही वरचढपणाची भाषा करत आहेत.आजतागायत जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून महानगरपालिकेला भरघोस निधी उपलब्ध करून देण्यात आला. शहराच्या पाणीपुरवठा योजना, स्वच्छता, विमानसेवा सुरू करणे, आयटी पार्कला मंजुरी, एमआयडीसीतील सुविधा या सर्व बाबींना गती देण्यात भाजप सरकारने पुढाकार घेतल्याचे गोरे यांनी सांगितले.
महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचार काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापुरात सभा घेऊन विकासाचे आश्वासन दिले होते. त्याचा सकारात्मक परिणाम म्हणूनच भाजपला ऐतिहासिक विजय मिळाल्याचे गोरे यांनी नमूद केले.सोलापूरकरांनी पुन्हा एकदा भाजपवर दाखवलेल्या विश्वासामुळेच शहरात एकहाती सत्ता मिळाली आहे.

आगामी काळात विस्तारित विमानसेवा, समतोल पाणीपुरवठा, आयटी पार्क, एमआयडीसी विकास आदी सर्व प्रकल्प मार्गी लावण्यासाठी भाजप सरकार कटिबध्द आहे, जयकुमार गोरे मोरे यांनी सांगितले.या सत्कार समारंभास सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, देवेंद्र कोठे या आमदारांसह माजी आमदार दिलीप माने, शहराध्यक्ष रोहिणी तळवळकर, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण डॉ शिवराज सरतापे आदी उपस्थित होते.











