महाराष्ट्रराज्यस्थापनेचं हे सुवर्णमहोत्सवी वर्ष. संयुक्त महाराष्ट्राचे एक शिल्पकार असलेल्या आचार्य अत्र्यांनी ‘माझ्या महाराष्ट्राला इतिहास आहे, बाकीच्या राज्यांना फक्त भूगोल आहे’, असे उद्गार काढले होते. आज एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक स्थित्यंतरं वेगाने घडत असताना महाराष्ट्र व मराठी या दोहोंच्या भविष्याची आखणी करणं गरजेचं झालं आहे. मात्र भविष्याचा वेध घेताना भूतकाळ तपासून बघणं आवश्यक ठरतं. आचार्य अत्र्यांनी उल्लेखलेल्या इतिहासाचा वेध हा महाराष्ट्राच्या व मराठीच्या भूतकाळाचा प्रवासच आहे.
महाराष्ट्र हे नाव तसं फार जुनं नाही. वराहमिहिराच्या ग्रंथात (इ.स. ५०५) आणि सत्याश्रय पुलकेशी याच्या इ.स. ६११ सालातील बदामीच्या शिलालेखात महाराष्ट्राचा प्रथम उल्लेख सापडतो. आपण हल्ली ज्या प्रदेशाला महाराष्ट्र म्हणतो, तो पूर्वी दक्षिणापथ या नावानं ओळखला जात असे. दक्षिणापथ म्हणजे दक्षिणेकडील मार्ग व दक्षिणेच्या मार्गावरील प्रदेश. दक्षिणेकडील प्रदेशाची नीटशी कल्पना उत्तरेकडील आर्यावर्तांत राहणार्या आर्यांना नसल्यामुळे त्यांनी या अज्ञात प्रदेशाला दिशादर्शक असं मोघम नाव दिलं.
दक्षिणापथ हे नाव तसं पुरातन आहे आणि ते विंध्यपर्वताच्या दक्षिण परिसराच्या खालच्या प्रदेशास लावण्याचा प्रघात होता. ख्रिस्तपूर्व काळातील पेरिप्लुस (सागरी मार्गाचे नकाशे) या दृष्टीने महत्त्वाचे ठरतात. त्यांत दक्षिणापथ या देशास Dakhinabhades असं नाव देऊन त्यांत भडोचपासून (Bargaza) द्रविड देशातील (Damiriea) व्यापारी पेठेच्या शहरांपर्यंतचा अंतर्भाव केलेला आहे. हे जे दामिरिच म्हणून शहर पेरिप्लुसांत लिहिले आहे, ते मार्कंडेय पुराणात सांगितलेलं दामरह नावाचं शहर असावं. इ. स. ३३०च्या सुमारास राज्य करणारा समुद्रगुप्त राजा आपल्या शिलालेखांत दक्षिणापथ म्हणजे नर्मदा नदीपासून थेट कन्याकुमारीचा प्रदेश असं म्हणतो. याच्या पुढचा ६०० वर्षांनंतरचा राजशेखर (इ.स. ९००-९४०) नावाचा ग्रंथकार हा आर्यावर्त आणि दक्षिणापथ या दोन प्रदेशांच्यामधील मर्यादा रेवा नदी असल्याचं सांगतो. याच काळातला चालुक्य कुळातील पहिला राजरज (इ. स. ९८५) हा दक्षिणापथाची मर्यादा नर्मदेपासून रामाच्या सेतूपर्यंत नेऊन या दोन्हींमधील प्रदेश पहिल्या विष्णुवर्धनाने (इ.स.६००) जिंकल्याचं सांगतो.
निरनिराळ्या काळातल्या ग्रंथकारांनी दक्षिणापथाची मर्यादा ही अशी सांगितली आहे. उत्तरमर्यादा नर्मदा आणि दक्षिणमर्यादा मात्र अनिश्चित अशी दक्षिणापथाची स्थिती होती. कधी कधी महाराष्ट्र व दक्षिणापथ ही दोन्ही नावं एकाच प्रदेशास अनुलक्षून स्थूल अर्थानं वापरलेली दिसतात. या दक्षिणेकडील प्रदेशाची आर्यांना फारशी माहिती नव्हती. त्यांच्या परिचयाचे प्रदेश म्हणजे आर्यावर्त आणि मध्यप्रदेश. तिथेच त्यांचं मांत्रिक पठण, यज्ञकर्मं वगैरे चालत असे. या देशाच्या पलीकडे कोणी आर्य गेलेच तर व्रात्य म्हणून पतित होत आणि पुन्हा आर्यांच्या समाजात सामावून घेण्यासाठी त्यांना व्रात्यस्तोमासारखे विधीही करावे लागत. आर्यावर्ताच्या बाहेर जाण्यासंबंधी असे सक्त निर्बंध असल्यामुळे सामान्य जनतेचा चौफेर संचार नव्हता. दक्षिणेकडे जायचं म्हणजे वनवासात जायचं असा प्राचीन काळी समज होता. या धार्मिक निर्बंधांबरोबरच निसर्गही फारसा अनुकूल नसल्यानं दक्षिणप्रांत आर्यांच्या ताब्यात येण्यासाठी उत्तरेकडील प्रदेशापेक्षा जास्त वेळ लागला. विंध्य, पुढे सातपुडा, दोन्ही बाजूंस सह्याद्रीच्या डोंगराळ खबदाडी. असा खडतर प्रवास उत्तरेकडील संपन्न व समृद्ध प्रांतांत सुखावलेले आर्य का ओढवून घेतील? म्हणूनच पुष्कळ काळ दक्षिणेकडील प्रांत आर्यांच्या दृष्टीने दंडकारण्यच राहिला.
महाराष्ट्राच्या वसाहतीसंबंधी एक पौराणिक आणि दुसरं ऐतिहासिक, अशी दोन मतं मांडता येण्यासारखी आहेत. या दोन्ही मतांत काळाच्या दृष्टीने फार अंतर आहे. यांपैकी पौराणिक मत आपण प्रथम पाहू. पौराणिक दृष्टीने महाराष्ट्रातील वसाहत ऋग्वेदसूक्तांच्या संहितीकरणापूर्वी, किंबहुना ऋग्वेदात उल्लेखलेल्या दाशराज्ञ युद्धापूर्वी झाली, असं म्हणता येतं. पौराणिक मत डॉ. केतकर यांनी आपल्या प्राचीन महाराष्ट्र या ग्रंथात मांडलं आहे. महाराष्ट्राचे स्थूलमानाने अपरान्त, विदर्भ आणि दंडकारण्य असे तीन भाग पडतात. त्यांपैकी पश्चिमेकडील अपरान्त (कोकणपट्टी) भृगु आणि त्याच्या वंशजांनी फार प्राचीन काळी, म्हणजे भार्गवरामाच्या – परशुरामाच्या- अवताराच्याही पूर्वी वसवल्याचं पुराणांवरून ठरतं. कोकण म्हणजे परशुरामाची कर्मभूमी आणि परशुरामाच्या कथेशी कोकणातील कोकणस्थ, देवरुखे, हैंग, नंबुद्री इत्यादी अनेक जातींचा संबंध येतो. भडोचचे जुने नाव भृगुकच्छ असं आहे. परशुरामाचं पूजन कोकणात अनेक ठिकाणी होतं. सोपार्यात आजही परशुरामाच्या अनेक मूर्ती आहेत. पश्चिम भाग जसा भृगुंनी तसा पूर्व भाग अगस्त्यांनी वसवला. या दोन पट्ट्यांच्या मधला भाग मात्र शापदग्ध असल्याने तितकासा वसाहतयोग्य नव्हता. इक्ष्वाकुवंशातील दण्डक नावाच्या राजाने भृगुवंशातील च्यवन नावाच्या ऋषीचा अपमान केल्यामुळे ऋषीने दण्डक राजाला शाप दिला. त्या शापाच्या प्रभावाने विंध्यापासून सेतुबंधापर्यंतचा प्रांत अरण्यमय झाला. दण्डकारण्य या नावाची ही उत्पत्ती.
कोकणासंबंधी निरनिराळ्या कथा पुराणांत आहेत. सह्याद्रीच्या उपप्रांतांत आपल्या पर्वतप्राय लाटा आदळून त्याच्या उच्चत्वाच्या स्पर्धेनं सूड घेणार्या समुद्रास परशुरामाने मागे हटवून आपल्यासाठी व आपल्या यज्ञकर्मासाठी भूमी तयार केली आणि चैत्यपुलिन (चिपळूण) इथे स्थंडिल तयार करून त्यासाठी कोळ्यांच्या जाळ्यांची जानवी करून त्यांना ब्राह्मणांची दीक्षा देऊन किंवा चितेवरील प्रेतांत प्राणज्योती पेटवून त्यांना ब्राह्मण्य दिले वगैरे कथा प्रसिद्ध आहेत. या प्रांतास पूर्वी अपरान्त म्हणत असत व त्याची मर्यादाही मोठी, म्हणजे उत्तरेला आनर्तापासून ते थेट कन्याकुमारीपर्यंत, अशी होती. या प्रांतास कोकण कधी म्हणू लागले, यासंबंधी ठाम प्रमाण मिळत नाही. नागांची जी कुळं महाभारतात सांगितली आहेत, त्यांत कुकुण असं एक कूळ आहे, आणि ते या प्रांतात खाली गोकर्णापर्यंत राहत होते, असा एक दाखला आहे. तेव्हा या कुकुण नागकुलाचा आणि कोकण या नावाचा काही संबंध असू शकतो.
कोकण या नावाची उपपत्ती आजपर्यंत पुष्कळांनी निरनिराळ्या प्रकारांनी दिली आहे. जुन्या संस्कृत आणि फारसी ग्रंथांत कोकण हा शब्द निरनिराळ्या प्रकाराने लिहिलेला आढळतो. संस्कृतात कुकुण, कुङ्कुण, कोङ्कण, कोंकण ही रूपं दिसतात, तर फारसीमध्ये केङ्केम, कंकण, कोंकम् ही रूपं दिसतात. या कोकण शब्दाच्या व्युत्पत्तीबद्दल अनेक मतप्रवाह दिसतात.
१. कोकण हा शब्द द्राविडी भाषेतून घेतला असावा.
२. कानडीत कोङ्कु असा एक शब्द आहे. त्याचा अर्थ उंचसखल जमीन असा आहे. कोङ्कु + वन = कोङ्कुवन = कोकण अशा मार्गाने हा शब्द आला असावा.
३. फारसीमध्ये कोह (=पर्वत), कुण्ड (=खाच, खड्डा) असे दोन शब्द अहेत. कोहकुण्ड = कोकुण्ड = कोकण अशा मार्गाने हा शब्द येतो. त्याचाही अर्थ पर्वतांच्या खाचांचा प्रदेश असा होतो.
४. किम् + किण्वम् (कसली ही वनस्पती?) अशा तर्हेचा प्रश्न पहिल्या वसाहतकारांनी उन्मादक ताडीसंबंधी विचारला असावा व त्यावरून कोकण हा शब्द आला असावा.
५. कोंग नावाचे रानटी लोक प्रथम या प्रांतात वसले असावेत आणि त्यावरून या देशास कोंगवन (=कोकण) हे नाव मिळालं असावं.
कोकणाचा व इतर बाह्य प्रांतांचा व्यापाराच्या दृष्टीनं संबंध फार पुरातन काळचा आहे. इतर देशाचे व्यापारी हिंदुस्थानाशी जो व्यापार करत तो कोकणातूनच होत असे. पुष्कळ अरबी शब्द जे दक्षिणेकडील भाषांत सापडतात, ते याच काळात आले असावेत. इसवी सनापूर्वी चार शतकांपूर्वीपासून हा व्यापार चालत असावा. सह्याद्रीच्या पलीकडे असलेलं दंडकारण्य मात्र या देवघेवीपासून अलिप्त होतं. कोकणातील पुष्कळ बंदरांचा उल्लेख जुन्या लेखांमध्ये सापडतो. टोलेमी (इ. स. १५०) याच्या Geographia या भूगोलविषयक ग्रंथात सिमुल्ल (Simulla) किंवा तिमुल्ल (Timula) असा जो उल्लेख येतो, किंवा त्याही पूर्वी प्लिनीने (इ.स. २००) पेरिमल (Perimula) असा जो उल्लेख केला आहे, किंवा कान्हेरीच्या शिलालेखांत (इ. स. २००) चेमुल्ल म्हणून जे बंदर उल्लेखलेलं आहे, ते कोकणातलं चेऊल किंवा चोल होय. याशिवाय पाल, कोल, कुड, राजपुरी, घोडेगाव या गावांचाही उल्लेख आहे. उत्तरेकडचं शूर्पारक (सोपारा) हे तर मौर्यांच्या राजवटीत एक स्तूप तिथे उभारण्याइतकं महत्त्वाचं होतं. या बंदरांतून माल आत थेट नाशिक – पैठणपर्यंत पोहोचवला जात असे. काही यवन लोक बौद्धधर्म स्वीकारून कोंकणात वस्ती करून होते, असं दिसतं. कारण कान्हेरी, नाशिक, कार्ले, जुन्नर इथल्या विहारांना त्यांनी मोठ्या प्रमाणात देणग्या दिल्या होत्या.
टोलेमी हा कोकणाचे पुढीलप्रमाणे चार विभाग करतो –
१. सौराष्ट्र – उत्तर गुजरात
२. लारीके – लाट, दक्षिण गुजरात
३. आरिआके = मराठा देश
४. दामरिके = दामिल, म्हणजे तामिळ लोकांचा प्रदेश .

