अक्कलकोट : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त बुधवारी अक्कलकोट नगरी अनंत कोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगिराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय ! या गजराने दुमदुमून गेली. वटवृक्ष निवासी स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांची गर्दी उसळली होती. दिवसभरात हजारो भाविकांनी दर्शन घेतले. पहाटे तीन वाजता मंदिर उघडताच पहिल्या आरतीसाठी भक्तांची मोठी उपस्थिती होती. पहाटे चार वाजता काकड आरती आणि सकाळी साडेअकरा वाजता नैवेद्य आरती मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे व प्रथमेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरोहित मोहन पुजारी व मंदार पुजारी यांच्या मंत्रोच्चारात पार पडल्या. आरतीच्यावेळी झालेल्या घंटानादाने आणि जयजयकाराने परिसर पवित्र वातावरणात न्हाऊन निघाला.


दरम्यान, पुणे, सातारा, मालेगाव, बार्शी, जेजुरी, भोर, फलटण, कर्जत, सावरगाव, धाराशिव, सोलापूर, मोहोळ आदी भागातून पायी दिंडी व पालखी सोहळे अक्कलकोटमध्ये दाखल झाले होते. स्वामीभक्तांच्या पावलांतील टाळ-चिपळ्या, भारूड आणि भजनांच्या स्वरांनी परिसर भक्तिमय झाला. पालखी सोहळ्यासोबत आलेल्या सर्व भक्तांसाठी मंदिर समितीच्यावतीने भक्तनिवासात महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. दूरवरून आलेल्या स्वामीभक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेत समाधान व्यक्त केले. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत अखंडपणे दर्शनासाठी भाविकांची रांग सुरू होती. महिलांसाठी आणि पुरुषांसाठी स्वतंत्र रांगा तयार करून सुलभ दर्शन व्यवस्था करण्यात आली. यामध्ये समितीचे अध्यक्ष इंगळे उपस्थित राहून व्यवस्थापन करत होते.
सायंकाळी वटवृक्ष मंदिर परिसरातील हजारो दिव्यांच्या दीपोत्सवाने संपूर्ण मंदिर उजळून निघाले. दीपोत्सवाचे हे दिव्य रूप पाहाण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. प्रकाशाच्या लखलखाटात स्वामींच्या मूर्तीचे सौंदर्य अधिक खुलून दिसत होते.







