सोलापूर: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. छत्रपती संभाजी नगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी अजितदादां सोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा देत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “दिलेला शब्द पाळणारे आणि कामाची कदर करणारे लोकनेते” अशा शब्दांत त्यांनी दादांना श्रद्धांजली वाहिली. स्वच्छ शाळा उपक्रम आणि दादांची शाबासकी दिलीप स्वामी यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून काम पाहिले आहे. त्या काळातील एक आठवण सांगताना ते भावूक झाले.


स्वामी यांनी सोलापूरमध्ये ‘स्वच्छ शाळा-सुंदर शाळा’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला होता. या उपक्रमातील उत्कृष्ट मुख्याध्यापकांचा सत्कार अजितदादांच्या हस्ते व्हावा, अशी त्यांची इच्छा होती. दादांनी कामाचे स्वरूप पाहून तातडीने होकार दिला होता. शब्दाला जागणारा नेता कोरोनाच्या संकटकाळात प्रत्यक्ष येणे शक्य नसल्याने दादांनी मंत्रालयातून व्हीसीद्वारे (VC) उपस्थिती लावली आणि मुख्याध्यापकांचे कौतुक केले. याच कार्यक्रमात त्यांनी सोलापूरमधील पापरी शाळेला भेट देण्याचे आश्वासन दिले होते. स्वामी सांगतात, “मला वाटले होते की दादांना वेळ मिळणार नाही, पण काही दिवसांतच त्यांच्या सचिवांचा फोन आला आणि दादांनी प्रत्यक्ष शाळेला भेट देऊन माझ्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. तो क्षण माझ्यासाठी श्रमाचे सार्थक करणारा होता.” खरे कौतुक आणि निस्वार्थ प्रेम “कोणताही राजकीय स्वार्थ नसताना केवळ चांगल्या कामाचे कौतुक करण्यासाठी वेळ देणारे दादा आज आपल्यात नाहीत, हे वास्तव स्वीकारणे कठीण आहे,” असे स्वामी यांनी नमूद केले. दादांच्या कार्याचा आदर्श घेऊन जनहितार्थ काम करत राहणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दांत त्यांनी आपला शोक व्यक्त केला.
“प्रसंग तसा छोटा होता, पण दिलेला शब्द पाळणारे आणि कामाचे कौतुक करणारे दादांचे व्यक्तिमत्त्व अतिशय मौल्यवान होते. त्यांच्या आठवणींनी आजही डोळे पाणावतात.”: दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजी नगर.










