सोलापूर ; मी “रेल्वे ब्रिज १९२२” बोलतोय…! लोखंडाचा सांगाडा म्हणून नव्हे, तर सोलापूरच्या श्वासात मिसळलेला एक जिवंत इतिहास म्हणून…! माझ्या खालून रेल्वे धावल्या,पण माझ्या कुशीतून माणसांचे स्वप्न, श्रम आणि संघर्ष धावले.
गिरण्यांचा सोन्याचा धूर मी पाहिला..कामगारांच्या हातातील घाम आणि डोळ्यातील स्वप्न अन् आशा मी ओळखल्या…! मी उभा राहिलो, तेव्हा गिरणगाव धगधगत होते… अर्धा लाख कामगारांची पावले माझ्या सावलीत उमटत होती. चाळी जाग्या होत्या आणि सोलापूरचे हृदय इथेच धडधडत होते.
मी पाहिलं मे १९३०चं रण…..स्वातंत्र्यासाठी उसळलेला संताप, लक्ष्मी–विष्णू गिरणी परिसरात उठलेला आवाज, ब्रिटिशांच्या गोळ्यांचा थरकाप आणि त्याहीपेक्षा प्रखर स्वातंत्र्याची आग. त्या चार दिवसांच्या स्वातंत्र्याचा श्वास माझ्या प्रत्येक लोखंडी श्वासात भरून राहिला.
मी फक्त दोन भूभाग जोडले नाहीत, तर मी काळ जोडला…भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यातील सोलापूर…!पूर्व–पश्चिम नाही, तर माणसांना माणसांशी जोडणारा मी एक दुवा होतो. १०३ वर्षे मी उभा राहिलो… वादळं आली, काळ बदलला, गिरण्या शांत झाल्या पण आठवणी कधीच थांबल्या नाहीत.
आज मला पाडलं जातंय…!
हो, माझं लोखंड झिजलं असेल पण माझ्या आठवणी अजून मजबूत आहेत.आज जेव्हा तुम्ही माझ्याजवळ थांबून मोबाईलचा फ्लॅश लावता… सेल्फी काढता, तेव्हा मला जाणवतं, मी अजूनही तुमच्या मनात उभा आहे. माझा निरोप हा शेवट नाही…मी मातीमध्ये जाईन,पण इतिहासात कायम राहीन.मी पाडला जातोय, पण पुसला जात नाहीय.

माझ्या सोलापूरकरांनो……. आज तुम्ही मला डोळ्यात साठवताय, मनात कोरताय आणि पुढच्या पिढ्यांना सांगणार आहात.. “हा फक्त पूल नव्हता, तर हा आमचा अभिमान होता…!” मी “रेल्वे ब्रिज १९२२”…. आज निरोप घेतोय, पण तुमच्या आठवणीत कायम उभा राहणार आहे…!! होय… कभी अलविदा ना कहना…!
( शब्दांकन – किरण बनसोडे, सोलापूर.)







