सोलापूर : सावकाराच्या त्रासाला कंटाळून एका ४३ वर्षीय व्यक्तीने रेल्वे रुळावर आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पडला आहे. आत्महत्येपूर्वी मयत व्यक्तीने मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवला होता. त्यामुळे खळबळ उडाली आहे. सोलापूर शहरातील कंबर तलावाजवळ शुक्रवारी सकाळी रेल्वे रुळावर ४३ वर्षीय जुबेर मशाक शेख यांचा मृतदेह आढळून आला.
जुबेर हे मूळचे राहुल गांधी झोपडपट्टीतील रहिवासी असून सध्या शास्त्रीनगर परिसरात कुटुंबासह राहत होते. प्राथमिक माहितीनुसार, सावकाराच्या सततच्या त्रासाला कंटाळून जुबेर यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. विशेष म्हणजे, घरातून बाहेर पडण्यापूर्वी त्यांनी आपल्या मोबाईलवर एक भावुक स्टेटस टाकले होते आणि एक व्हिडिओही रेकॉर्ड करून ठेवला होता. हा व्हिडिओ आत्महत्येपूर्वीचा असल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. या व्हिडिओत जुबेर यांनी सावकाराच्या त्रासाचा स्पष्ट उल्लेख केल्याची माहिती नातेवाइकांनी दिली आहे. नातेवाइकांनी याप्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
जुबेर यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि बहीण असा परिवार आहे. घटनेची माहिती मिळताच सोलापूर रेल्वे पोलीस ठाण्याच्या धाव पथकाने घटनास्थळी घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी सिविल रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.







