सोलापूर : होटगी रोडवरील जलसंपदा विभागाच्या 50 एक जागेत 50 कोटी रुपयांत आयटी पार्क होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मंगळवारी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तरुणांना जिल्ह्यातच रोजगार उपलब्ध होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या सूचनेनुसार सोलापुरातील आयटी पार्कसाठी जागा पाहणी काही दिवसांपूर्वीच करण्यात आली. यात अनेक ठिकाणच्या जागाही पाहण्यात आल्या. मात्र, होटगी येथील जलसंपदा विभागाच्या 50 एकर जागेत केवळ 50 कोटींच्या निधीतून आयटी पार्क उभारणे शक्य होणार असल्याने येथील जागेस पसंती देण्यात येत आहे.
आयटी पार्कसाठी जुनी मिल परिसराची जागा पाहणी करण्यात आली होती. मात्र ही जागा अपुरी असल्याचा अंदाज आयटी पार्कमधील तज्ज्ञांनी व्यक्त केला. हिरज येथील जागेचीही यासाठी पाहणी करण्यात आली. ही जागा योग्य होती, मात्र सदर जागा माळढोक क्षेत्रात येत असल्याने ही जागा अडचणीची ठरली आहे. त्यामुळे आयटी पार्कसाठी आयटी पार्कक्षेत्रातील मान्यवरांनी होटगी रोडवरील जागेस पसंती दिली आहे. मात्र ही जागाही अजून निश्चित करण्यात आली नसल्याचेही जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट सांगितले.
जुनी मिल येथील जागा आयटी पार्क उभारण्यासाठी पाहण्यात आली. मात्र, या जागेचा वाद न्यायालयात आहे. शिवाय येथील जागाही अपुरी आहे. न्यायालयातून वाद मागे घेण्यासाठी संबंधितांना विनंती केल्यानंतर प्रशासनाकडे शंभर कोटींच्या मोबदल्याची मागणी करण्यात आली. त्यामुळे येथील जागेचा विचार मागे पडला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
सोलापुरातील होटगी रोडवर आयटी पार्क झाल्यास याठिकाणी किमान 30 हजार कर्मचारी काम करतील, अशी इमारत रचना असणार आहे. तसेच गरज पडल्यास आणखी कर्मचारी बसतील, अशी सोय आयटी पार्कच्या ठिकाणी करणे शक्य असल्याचे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले.







