सोलापूर: सोलापूर शहरातील मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी जेलरोड पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने धडक कारवाई केली आहे. या कारवाईत चोरीचे एकूण १११ मोबाईल हस्तगत करण्यात आले असून, त्याची बाजारभावाप्रमाणे किंमत १३,९२,९९८/- रुपये (तेरा लाख बावन हजार नऊशे अठ्ठावन रुपये) इतकी आहे.
जेलरोड पोलीस ठाणे हद्दीत जानेवारी महिन्यात मोबाईल चोरीचे ४ गुन्हे दाखल झाले होते. या गुन्ह्यांच्या तपासासाठी पोलीस उपायुक्त विजय कबाडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण यांनी दिलेल्या आदेशानुसार तपास सुरू होता. दिनांक १७/०१/२०२६ रोजी जेलरोड पोलीस स्टेशनचे अंमलदार संतोष वायदंडे आणि कल्लप्पा देकाणे यांना खात्रीशीर बातमी मिळाली की, एक इसम चोरीचे मोबाईल विकण्यासाठी इक्बाल मैदान येथे येणार आहे. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण पथकाने सापळा रचून फारूक महमद हनिफ पठाण (वय ४२ वर्ष, रा. सिद्धेश्वर पेठ, सोलापूर) याला ताब्यात घेतले.
संशयित फारूक पठाण याच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्याने दोन तडीपार आरोपींकडून हे मोबाईल विक्रीसाठी घेतल्याची कबुली दिली. पोलिसांनी या प्रकरणी गणेश उर्फ आप्पा तुकाराम बैरुणगी (तडीपार आरोपी, रा. राहुल गांधी नगर), लखन तुकाराम बैरुणगी (तडीपार आरोपी, रा. राहुल गांधी नगर) या आरोपींना निष्पन्न केले आहे.


ही कामगिरी सोलापूर पोलीस आयुक्त. एम. राजकुमार, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, आणि सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) भाऊराव बिराजदार, सपोनि संदीप पाटील व त्यांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने (डीबी पथक) यशस्वीरीत्या पार पाडली.










