मुंबई : महायुती सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1,500 रुपयांचा थेट हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो. आतापर्यंत काही महिन्यांचे हप्ते सरकारकडून नियमितपणे वितरित करण्यात आले आहेत. मात्र, लाभार्थी महिलांची माहिती अधिक अचूक आणि पारदर्शकपणे पडताळली जावी, यासाठी महिला व बालविकास विभागाने आता ई-केवायसी प्रक्रिया बंधनकारक केली आहे.
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या संदर्भात स्पष्ट सूचना देत म्हटलं आहे की, राज्यभरातील सर्व पात्र लाभार्थी भगिनींनी 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी आपली e-KYC प्रक्रिया पूर्ण करावी. आतापर्यंत बहुतांश महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. तथापि, काही लाभार्थ्यांनी अजूनही e-KYC केलेले नाही. त्यामुळे शिल्लक असलेल्या महिलांनी दिलेल्या अंतिम मुदतीपूर्वी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. अन्यथा, त्यांचा पुढील हप्ता रोखला जाऊ शकतो. राज्य सरकारने महिला लाभार्थ्यांना या प्रक्रियेत मदत व्हावी यासाठी स्थानिक महिला व बालविकास कार्यालयांत विशेष सहाय्यता केंद्रे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांनाही ही प्रक्रिया सहज पूर्ण करता येईल आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ अखंडितपणे सुरू राहील.
सुरुवातीला काही लाभार्थ्यांना OTP संबंधित तांत्रिक अडचणी आल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. या बाबत मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावरून आश्वासन दिलं आहे की, सर्व तांत्रिक अडचणी दूर करण्याचे काम तातडीने सुरू आहे. कोणत्याही भगिनीला योजनेचा लाभ मिळण्यात विलंब होणार नाही. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित महिलांच्या खात्यावर निधी थेट जमा केला जाईल.







