सोलापूर : लोकमंगल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आमदार सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नपूर्णा योजना-एक मुठ्ठी अनाज हा समाजोपयोगी उपक्रम जून महिन्यापासून राबवला जात आहे. आतापर्यंत २१ शाळांनी सहभाग नोंदवून शेकडो किलो धान्य संकलित करण्यात आले आहे.
या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये दातृत्वाची भावना निर्माण करणे, दानाचे महत्त्व समजावणे तसेच आपल्या कुटुंबातील ज्येष्ठांना कधीही निराधार होऊ न देण्याचा संकल्प विद्यार्थ्यांकडून करून घेणे हा आहे. या संकल्पामधून मुलांमध्ये सामाजिक जाणीव आणि संवेदनशीलतेचे संस्कार होत असून, दानातूनच संस्कार हा संदेश फाउंडेशनने दिला आहे. हा उपक्रम लोकमंगल फाउंडेशनचे संचालक मारुती तोडकर यांच्या प्रयत्नातून अधिकाधिक शाळांमध्ये राबवला जात आहे.

या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी दिलेला प्रतिसाद अत्यंत उत्साहवर्धक आहे. या उपक्रमात शहर आणि जिल्ह्यातील सर्व शाळांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन फाउंडेशनच्यावतीने लोकमंगल मारूती तोडकर आणि पदाधिकाऱ्यांनी केले आहे.







