सोलापूर: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सोलापूर येथे आयोजित करण्यात आलेले मोफत २डी इको, हृदय तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिर अत्यंत उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडले. शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन, ज्युपिटर हॉस्पिटल, आरोग्यदूत फाऊंडेशन आणि शिवसेना सोलापूर जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने या भव्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराचे उद्घाटन नवनिर्वाचित राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे, सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख दगडू सकपाळ आणि माजी राज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे आणि सोलापूर वैद्यकीय मदत पक्षाचे सुरज जम्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.


गरजू बालकांना अत्याधुनिक उपचार मोफत मिळावेत या उद्देशाने राबवल्या जाणाऱ्या या उपक्रमातून आतापर्यंत १०,००० हून अधिक बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्या आहेत. ज्युपिटर हॉस्पिटलचे डॉ. आशुतोष सिंह, डॉ. पूजा सिन्हा आणि त्यांच्या टीमने विशेष परिश्रम घेतले. शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे आणि त्यांच्या टीमने या संपूर्ण उपक्रमाचे नियोजन व समन्वय प्रभावीपणे हाताळले.
याप्रसंगी अमोल बापू पाटील, मनिष काळजे, डॉ. बापूसाहेब अडसूळ यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंगेश चिवटे यांचे विशेष आभार : सोलापूर येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेले मोफत २डी इको आणि हृदय तपासणी शिबिर अत्यंत यशस्वीरीत्या पार पडल्याबद्दल तुमचे आणि तुमच्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन! १०,००० हून अधिक बालकांना नवजीवन देणारी ही सेवा परंपरा खरोखरच प्रेरणादायी आहे. तुमच्या प्रभावी नियोजनामुळे आणि सामाजिक बांधिलकीमुळे अनेकांना मदतीचा हात मिळाला आहे. असेच जनसेवेचे कार्य तुमच्या हातून घडत राहो, हीच सदिच्छा!”










