सोलापूर : शरद पवार गटाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी राजीनामा देत अजित पवार गटात प्रवेश केला. तो शरद पवारांसाठी धक्का असल्याचं मानलं जात असताना पवारांनी त्यांचा विश्वासू मोहरा समोर आणला आहे. सोलापूर शहराध्यक्षपदी महेश गादेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महेश गादेकर हे 1992 पासून शरद पवारांसोबत (Sharad Pawar NCP) काम करतात. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर त्यांनी काँग्रेस सोडली आणि पवारांसोबत गेले. तेव्हापासून आतापर्यंत ते पवारांशी एकनिष्ठ आहेत. त्यामुळे आता शरद पवारांनी शहराध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा एकदा विश्वासू नेत्याकडे सोपवल्याची चर्चा आहे.
कोण आहेत महेश गादेकर?
महाविद्यालयीन जीवनापासून महेश गादेकर यांनी समाजकारण आणि राजकारणास सुरुवात केली. 1992 झाली त्यांच्या पक्षीय राजकारणास सुरुवात झाली. सोलापूर शहर युवक काँग्रेसमध्ये उपाध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. त्यांच्या कामाच्या जोरावर 1996 साली ते सोलापूर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. 1997 च्या महापालिका निवडणुकीत त्यांनी सर्वात जास्त तरुण कार्यकर्त्यांना तिकिटे देऊन निवडून आणले. 1999 साली राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर ते शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले.
सन 2010 साली त्यांच्यावर सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी पक्षाने दिली. 2012 साली झालेल्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वात जास्त 17 नगरसेवक निवडून आणले. 2014 मध्ये त्यांनी सोलापूर शहर उत्तर मतदार संघात विधानसभेची निवडणूक लढवली. आता त्यांच्यावर पुन्हा एकदा सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
खासदार शरद पवार साहेब यांच्या संसदीय कारकिर्दीला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी सोलापुरात पहिला भव्य दिव्य असा कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमास राज्यातील आणि देशातील अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. सोलापूर शहराध्यक्ष असताना त्यांनी फिरता दवाखाना ही संकल्पना सलग पाच वर्षे राबवत पाच लाख लोकांवर मोफत उपचार केले.
क्रीडा क्षेत्रात योगदान
महेश गादेकर हे राजकारणाबरोबर क्रीडा क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांना महाराष्ट्रातील मनाच्या सर्वोत्कृष्ट शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सध्या ते महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशनचे उपाध्यक्ष, सोलापूर शहर जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत.
सोलापूर शहर जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष, सोलापूर शहर व जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. महेश गादेकर यांनी 2015 साली सोलापूर शहरात खो खो ची राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा प्रथमच घेतली.








