सोलापूर: सोलापूर शहर गुन्हे शाखेने अंमली पदार्थ तस्करीविरुद्ध एक मोठी आणि धडाकेबाज मोहीम फत्ते केली आहे. जुना देगांव नाका परिसरातील थोबडे वस्ती येथे राहत्या घराच्या आवारात गांजाची बेकायदेशीर लागवड करणाऱ्या रजाक गफूर शेख (वय ४९) याला पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत एकूण ४ लाख ३९ हजार ९०० रुपये किमतीचा २१.४३९ किलो ग्रॅम गांजा हस्तगत करण्यात आला आहे.
३० मार्च २०२६ रोजी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अरविंद माने आणि त्यांचे पथक पोलीस आयुक्तालय हद्दीत गस्त घालत होते. गस्तीदरम्यान थोबडे वस्ती येथील रोडच्या डाव्या बाजूस एक व्यक्ती संशयास्पदरीत्या प्लास्टिक पिशवी घेऊन बसलेली पथकाला दिसली. पोलिसांनी गोपनीयरीत्या त्याच्या हालचालींवर पाळत ठेवली असता, तो पिशवीतील गांजाच्या पुड्यांची विक्री करत असल्याचे उघड झाले.


पोलिसांनी संशयित आरोपी रजाक शेख याला ताब्यात घेऊन त्याची सखोल चौकशी केली. झडतीदरम्यान त्याच्याकडे २२७ ग्रॅम गांजा सापडला. मात्र, पोलिसांनी अधिक तपास केला असता एक धक्कादायक बाब समोर आली. आरोपीने चक्क स्वतःच्या घराच्या कंपाउंडमध्ये आणि घरासमोरील मोकळ्या जागेत गांजाच्या ५९ झाडांची लागवड केली होती. पोलिसांनी ही सर्व झाडे उपटून जप्त केली असून त्यांचे वजन २१.२१२ किलो भरले आहे. याप्रकरणी आरोपीविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे एन.डी.पी.एस. अॅक्ट (NDPS Act) कलम २०(अ) आणि २०(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही धडाकेबाज कामगिरी पोलीस आयुक्त एम. राज कुमार, उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील, सहा. आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, पो.उप.नि. मुकेश गायकवाड, पोलीस अंमलदार नंदराम गायकवाड, वाजीद पटेल, योगेश बर्डे, संजय साळुंखे, भारत पाटील आणि इतर पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. या कारवाईमुळे सोलापुरातील अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत










