सोलापूर : महापालिका निवडणूक भयमुक्त वातावरणात म तदान व्हावे, अशी मागणी महावीकास आघाडीच्या वतीने पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. तसेच खासदार प्रणिती शिंदे आणि महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींनी खुनी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या बाळासाहेब सरवदे यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.

महानगरपालिका सार्वजनिक निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू असून सर्व राजकीय पक्ष निवडणुकीत सहभागी झाले आहेत. शुक्रवारी घडलेल्या खूनी हत्येच्या घटनेतून भाजप कार्यकर्त्यांची गुंड प्रवृत्ती उघड झाली असून, निवडणूक काळात प्रत्येक प्रभागात दमदाटी करणे, उमेदवारांवर उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव आणणे, मारहाण करणे तसेचविविध प्रकारे दहशत निर्माण करणे हे प्रकार सर्रास सुरू असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

त्यामुळे सोलापूर शहरात विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांना भयमुक्त वातावरणात फिरणे व प्रचार करणे अवघड झाले आहे.भाजपा कार्यकर्त्यांकडून मनसेच्या पदाधिकाऱ्याची झालेल्या हत्येप्रकरणी खुनाचा सूत्रधार व मारेकरी यांच्यातील मोबाईल संवादाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. यावेळी खासदार प्रणिती शिंदे, माजी आमदार नरसय्या आडम मास्तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष महेश गादेकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष अजय दासरी, शिवसेना उपनेत्या अस्मिता गायकवाड, अशोक निंबर्गी, भारत जाधव, युसुफ मेजर, प्रताप चव्हाण, तिरूपती परकीपंडला, अॅड. केशव इंगळे आदी उपस्थित होते.











