सोलापूर ; उत्तर सोलापूर तालुक्यातील मौजे पडसाळी येथे अवकाळी पावसामुळे झालेल्या द्राक्ष पिकाच्या नुकसानीची पाहणी माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केली.या दौऱ्यात त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला असून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. मंत्री शेलार यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांची स्थिती पाहिली आणि शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे आश्वासन दिले.




यावेळी श्री. शहाजी पवार तसेच तहसीलदार निलेश पाटील उपस्थित होते. त्यांनी नुकसानीबाबत प्राथमिक माहिती दिली. शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासनही देण्यात आले. यावेळी नुकसानग्रस्त शेतकरी ही मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पाहणी दौऱ्यामुळे शेतकऱ्यांमध्ये दिलासा निर्माण झाला असून शासन त्यांच्या पाठीशी उभे राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.










