मुंबई : मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यातील एकूण 29 महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा आज होण्याची दाट शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक प्रक्रियेची जवळपास सर्व तयारी पूर्ण करण्यात आली असून, आज दुपारी 4 वाजता आयोगाने पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. या पत्रकार परिषदेत महापालिका निवडणुकांच्या तारखा, मतदानाचा कालावधी तसेच निकाल जाहीर होण्याची संभाव्य तारीख याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच राज्यात आचारसंहिता तात्काळ लागू होईल. त्यामुळे संबंधित महापालिका क्षेत्रांमध्ये नवीन घोषणा, निर्णय आणि विकासकामांवर निर्बंध येणार आहेत. आचारसंहिता लागू झाल्यानंतर प्रशासन आणि राजकीय पक्षांची हालचाल वाढणार असून, निवडणूक प्रचाराला वेग येईल. राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे असून, आगामी महापालिका निवडणुका अत्यंत चुरशीच्या ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.







