पंढरपूर : वनपरिक्षेत्र अधिकारी (आरएफओ) श्रीमती शीतल बालाजी चाटे यांच्यावर मुरूम माफियांनी अंगावर टिप्पर घालून प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. चाटे यांनी प्रसंगावधान राखून वेळेत बाजूला उडी मारल्याने त्या बचावल्या. चाटे यांच्या हातातील मोबाईल हिसकावून जप्त तीन वाहनांसह शासकीय कामात अडथळा आणत तीन वाहनांसह पळ काढला. करकंब पोलिस ठाण्यात या प्रकरणी चार आरोपींवर भारतीय न्याय संहिताच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल झाला आहे. पंढरपूर वनपरिक्षेत्रातील खरातवाडी (गट नं. २८०) येथे दि. ६ रोजी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास शासकीय कर्तव्य बजावत असताना ही घटना घडली.
याबाबत मिळालेली माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती शीतला चाटे, वनपाल बापूराव शंकरराव भोई हे गस्तीवर होते. तेव्हा त्यांना खरातवाडी वन क्षेत्रातून ३ टिप्पर अवैध गौण खनिज (मुरूम) भरून जाताना आढळले. यातील एका टिप्परचा क्रमांक (एमएच १६ एवाय ६८१६) होता. तर दोन टिप्पर विना-नंबर प्लेट होते. श्रीमती चाटे यांनी सदर वाहने थांबवून, ‘मी वनपरिक्षेत्र अधिकारी आहे’ असे स्पष्ट सांगून वाहनचालकास स्वतःचा परिचय करून दिला. तसेच वाहन चालकांकडे परवान्याची मागणी केली, तेव्हा त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली.
या वाहनांमध्ये अवैध मुरूम असल्याचे निष्पन्न झाल्याने, ती जप्त करून वन कार्यालयात नेण्याचे आदेश देण्यात आले. वाहने जप्त करून नेत असताना, आरोपी सिद्धार्थ चंद्रकांत नाईकनवरे (रा. व्होळे ता. पंढरपूर) याने बनाव करून टिप्पर थांबवला. अधिकाऱ्यांनी विचारणा केली असता, त्याने ‘वनविभाग तुमच्या बापाचा नाही’ अशा अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यात आली. तोंडाला रुमाल बांधलेला एक अनोळखी इसम तिथे आला. श्रीमती चाटे यांनी त्यालाही आपली ओळख पत्र दाखवून परिचय दिला. तरीही त्याने वाद घालत श्रीमती चाटे यांचा मोबाईल बळजबरीने हिसकावून घेतला. तर अनोळखी इसमाने गाडी चालू केली. श्रीमती चाटे यांनी गाडी नहलवण्याबाबत काय. देशीर समज दिली. तरी देखील आरोपीने ‘तुम्ही बाजूला व्हा, नाहीतर मी टिप्पर तुमच्या अंगावर घालीन’ अशी उघड धमकी दिली.
या प्रकरणी वनविभागामार्फत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. वन अधिकारी आणि कर्मचारी आपले कर्तव्य बजावताना अशा हल्ल्यांना भीक घालणार नाहीत. अवैध व्यवसायांवर कडक कारवाई सुरूच राहील, असा संदेश वन विभागाने दिला आहे.










