मुंबई : काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात रंगली आहे. पण भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही चर्चा फेटाळून लावली आहे. नाना पटोले यांच्या व्यक्तिमत्त्वार असा संशय निर्माण करण्यात कोणतेही तथ्य नाहीत. ते भाजपच्या संपर्कात नाहीत. ते निष्ठावान काँग्रेस कार्यकर्ते आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.
आमदार नाना पटोले हे सध्या काँग्रेसमध्ये नाराज असल्याची चर्चा आहे. काँग्रेसच्या भंडारा जिल्ह्यातील एका स्थानिक कार्यकर्त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट टाकल्यामुळे ही चर्चा सुरू झाली आहे. पत्रकारांनी शुक्रवारी याविषयी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना छेडले असता नाना पटोले एक निष्ठावान काँग्रेस कार्यकर्ते असल्याचे नमूद करत ते भाजपच्या संपर्कात नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, नाना पटोले यांच्या व्यक्तिमत्त्वावर अशा प्रकारचा संशय निर्माण करण्यात कोणतेही तथ्य नाहीत. ते भाजपच्या संपर्कात नाहीत. ते काँग्रेसचे एक निष्ठावान कार्यकर्ते आहेत.

नाना पटोलेंनी निवडणुकीत काँग्रेसची भूमिका अत्यंत निष्ठेने पार पडली. त्यांना अपयश आले हे दुसरी गोष्ट, पण नाना पटोले हे खऱ्या अर्थाने भाजपच्या कोणत्याही नेत्याशी, कोणत्याही पक्षप्रवेशावर किंवा पक्षात येण्यावर भूमिकाच घेऊ शकत नाहीत. कारण, त्यांची भूमिका काँग्रेसची आहे. काँग्रेसचे ते सक्रिय कार्यकर्ते आहेत. पदाधिकारी आहेत. नेते आहेत. त्यामुळे नाना पटोलेंसारख्या व्यक्तीवर असा संशय व्यक्त करणे माझ्या मते योग्य नाही.







