सोलापूर : आज सोलापूर मध्यवर्ती बसस्थानकाला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अचानक भेट दिली. या भेटी दरम्यान सर्वसामान्य प्रवासी व नागरिकांनी केलेल्या तक्रारीवरून बसस्थानकावरील शौचालयाची पाहणी केली असता, तेथील अस्वच्छता आणि दुर्गंधीयुक्त परिसर पाहून संबंधित आगार व्यवस्थापकाला जाब विचारत धारेवर धरले.









शौचालयाचे व्यवस्थापन बघणाऱ्या खाजगी संस्थेकडून महिलांकडून वाजवी पेक्षा जास्त पैसे घेतले जातात अशी तक्रार उपस्थित महिलांनी केली. तसेच जवळच असलेल्या पाणपोई परिसरात देखील अत्यंत अस्वच्छता असल्याचे आढळून आले. या बाबतीत उपस्थित आगार व्यवस्थापक व वाहतूक नियंत्रक यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. त्यामुळे संबंधित आगार व्यवस्थापक यांच्यावर जबाबदारी निश्चित करून त्यांना वरिष्ठांनी कारणे दाखवा नोटीस बजावावी असे निर्देश दिले.
तसेच पुढील ४ दिवसात उपरोक्त त्रुटी दूर करून प्रवाशांना चांगल्या सुविधा निर्माण करून देण्याचे निर्देश देखील संबंधितांना दिले आहेत. याबाबत पुढील दौऱ्याच्या वेळी पुनश्च: तपासणी करून त्यानंतर देखील प्रवासी सुविधांमध्ये हलगर्जीपणा आढळून आल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल असा सज्जड दम यावेळी दिला. एसटी महामंडळाच्या माध्यमातून प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना चांगल्या सेवा आणि सुखद अनुभव मिळावा यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.







