पंढरपूर : कार्तिकी एकादशी दिवशी लाखो भाविकांनी चंद्रभागा नदीमध्ये पवित्र स्नानाची पर्वणी साधली. सावळ्या विठुरायाच्या दर्शनाची आस घेऊन राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सुमारे सहा लाख भाविकांमुळे अवघी पंढरी भक्तीरसात तल्लीन झाली होती.
दिंडीतील भाविकांच्या ज्ञानेश्वर माऊली.. ज्ञानराज माऊली तुकाराम… च्या जयजयकाराने आणि टाळ मृदुंगाच्या जयघोषाने अवघी पंढरी नगरी दुमदुमून गेली होती. श्री विठ्ठलाची पदस्पर्श दर्शन रांग गोपाळपूर रस्त्यालगतच्या सर्व पत्रा शेड भाविकांनी भरून १३ नंबरच्या शेडच्या पुढे गेली होती. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने एकादशी निमित्त दर्शन रांगेतील भाविकांना साबुदाणा खिचडी, पिण्याचे पाणी व चहाचे वाटप करण्यात आले.
कार्तिक शुद्ध एकादशी ही कार्तिकी एकादशी म्हणून साजरी केली जाते. कार्तिकी एकादशीला चातुर्मास समाप्त होतो आणि त्यामुळे ही एकादशी मोठी एकादशी म्हणून देखील ओळखली जाते. वारकरी संप्रदायामध्ये एकादशीच्या चंद्रभागा नदी स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे रविवारी (ता. २) एकादशी दिवशी चंद्रभागेच्या तीरावर पवित्र स्नानासाठी हजारो भाविकांनी अलोट गर्दी केली होती. नदीत स्नान करून भक्त पुंडलिकाचे दर्शन घेतल्यानंतर भाविक लगबगीने दर्शन रांगेकडे जात होते.
दरम्यान श्री विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन घेऊन मंदिरा बाहेर आलेले भाविक मोतीराम पांडुरंग राठोड (रा.उकली, ता. बसवन बागेवाडी, जि. विजापूर) ‘सकाळ’शी बोलताना म्हणाले, आम्ही शनिवारी (ता.१) रात्री आठ वाजता तेरा नंबर पत्र शेडच्या बाहेर उभा होतो. जवळपास चौदा तासानंतर सकाळी दहा वाजता श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले. तर श्री विठ्ठलाचे मुखदर्शन घेतलेले रामदेव विठोबा कदम (रा. वडगल, ता. पोलादपूर, जि. रायगड) म्हणाले, एकादशी दिवशी सकाळी नऊ वाजता मंगळवेढा रस्त्यावरील दर्शन रांगेत उभा होतो. दोन तासानंतर सकाळी अकरा वाजता श्री विठ्ठलाचे मुखदर्शन प्राप्त झाले.







