बार्शी : दक्षिण मध्य रेल्वेने तिरुपती-पंढरपूर ही एक्स्प्रेस कुर्डूवाडी- बार्शी-धाराशिव-लातूर मार्गे सुरू केली आहे. ही साप्ताहिक गाडी असून तिरुपतीवरुन दर शनिवारी सायं. ४.४० वा निघून दुसऱ्या दिवशी बार्शी इथे साधारण सायंकाळी ५ वा तर पंढरपूर इथे सायं. ६.५० वा पोहोचेल. तसेच पंढरपूर येथून दर रविवारी रात्री ८ वा. निघून बार्शी येथे साधारण रात्री ९.३० वा. तर तिरुपती येथे दुसऱ्या दिवशी रात्री १०.३० वा. पोहोचेल. सुरुवातीला या गाडीला बार्शी व धाराशिव हे दोन्ही थांबे दिले गेले नव्हते. त्यामुळे रेल्वे प्रवासी सेलच्यावतीने रेल्वे प्रशासनाला हे दोन्ही थांबे देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली होती.
रेल्वे प्रशासनाने त्वरित याची दखल घेऊन बार्शी व धाराशिव थांबे मंजूर करण्यात आले आहेत. बार्शी लाईट रेल्वेची देवाची गाडी ही जुनी ओळख या तिरुपती- पंढरपूर एक्सप्रेसमुळे सार्थ झाल्याचे मत रेल्वे प्रवासी सेलचे शैलेश वखारिया यांनी व्यक्त केले. रविवारी येणाऱ्या तिरुपती पंढरपूर एक्सप्रेसचे स्वागत रेल्वे प्रवासी सेलच्यावतीने बार्शी रेल्वे स्टेशन येथे करणार असल्याची माहिती कनिष्क बोकेफोडे व अजित काळेगोरे यांनी दिली.
या गाडीचे थांबे- रेणीगुंटा, राजमपेटा, ओंटिमिट्ट, कडपा, येरगुंटला, ताडीपत्री, गुटी, डोन, कर्नूल सिटी, गदवाल, वनपर्ती रोड, महेबूबनगर, जडचर्ला, शादनगर, उमदानगर, काचीगुडा, सिकंदराबाद, बेगमपेट, लिंगमपल्ली, शंकरपल्ली, विकाराबाद, जहीराबाद, बीदर, भालकी, उदगीर, लातूर रोड, लातूर, धाराशिव, बार्शी टाऊन, कुर्डूवाडी, मोडनिंब अशी ही एक्सप्रेस धावणार आहे.







