मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात बोलताना पक्षातून बाहेर पडलेल्या नेत्यांवर आणि कार्यकर्त्यांवर सडकून टीका केली. आशिया कप जिंकल्यावर जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाशी करतो तो माणूस बेशरम आहे, असे म्हणत पंतप्रधान मोदींवरही निशाणा साधला. क्रिकेट आणि पाकिस्तानसोबत? कशाला थोतांड केले तुम्ही? पहलगाममध्ये धर्म बघून गोळ्या घालण्यात आल्या. तुमच्या देशात हिंदू सुरक्षित नाहीत. बाप हिंदुत्वाचे ढोंग करतो आणि पोरगा पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळतो, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
आज मी महाराष्ट्र सरकारला इशारा देत आहे की, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करा, हेक्टरी 50 हजार रुपये जाहीर करा, नाहीतर मराठवाड्यात आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. राज्यभर आम्ही आंदोलन करू. यांनी जाहीर नाही केले तर मोर्चा लावायचा. शेतकऱ्यांचा हक्क आहे, जिथे अन्याय होईल तिथे वार करणे, मी या थोडक्यात गोष्टी सांगत आहे. या अंधभक्तांना खरे हिंदुत्व काय आहे ते दाखवून द्यायचे आहे. आपला भगवा डौलाने फडकवा.
उद्धव ठाकरे म्हणाले, आत्ता कोणी तरी विचारात होते ठाकरे बंधू एकत्र येणार का? मग 5 जुलैला काय केले होते आम्ही? तेव्हा आम्ही म्हणालो होतो, आम्ही एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी. जिथे मातृभाषेचा घात होत असेल, तिथे मी मराठी माणसात फुट पडू देणार नाही. आणि मराठीवर हिंदीची सक्ती, मी जाहीरपणे सांगतो आमचा हिंदीला विरोध नाही, पण आमच्यावर सक्ती करायची नाही. भाषावार प्रांत रचना झाली आहे. मराठी लोकांना महाराष्ट्र मिळाला आहे. महाराष्ट्राला राजधानी मिळाली नव्हती. या मुंबईसाठी मराठी माणसाने रक्त सांडून राजधानी बनवली आहे.
दसरा मेळाव्यात राज ठाकरे येणार का? वगैरे प्रश्न आमच्यावर उपस्थित करत आहेत. मला या मराठी द्वेषट्यांना सांगायचे आहे, तुम्ही आमच्या मराठीला हात लाऊन दाखवाच, हिंमत असेल तर हात लाऊन दाखवा, हात जागेवर ठेवणार नाही. आमच्या अंगावर येऊ नका, एकतर कोणाच्या अंगावर जायचे नाही पण कोणी अंगावर हात उचलला तर तो हात जागेवर ठेवायचा नाही, ही शिकवण आम्हाला बाळासाहेबांनी दिली आहे.







