सोलापूर : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवार, ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता हुतात्मा स्मृती मंदिर येथे महिला आरक्षण सोडतीचा कार्यक्रम होणार आहे. या प्रारूप आरक्षण सोडतीनंतर हरकती व सूचना मागविण्यासाठी १७ ते २४ नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे.
महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक अंतर्गत १३ ऑक्टोबर रोजी अंतिम प्रभाग रचना प्रसिध्द करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून प्रभाग रचना आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. यामध्ये ३० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबरपर्यंत आरक्षित जागांची संख्या निश्चित करुन त्यास राज्य निवडणूक आयोगाची मान्यता मिळण्यासाठी महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्याकडून प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर ८ नोव्हेंबर रोजी आरक्षण सोडतीची जाहीर सूचना प्रसिध्द करण्यात येणार असून ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता हुतात्मा स्मृती मंदिर येथे महिलांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. प्रारूप आरक्षण सोडतीनंतर प्रारुप आरक्षणावर हरकती व सूचना मागविण्यासाठी विहित नमुन्यात १७ते २४ नोव्हेंबरपर्यंत अंतिम मुदत आहे. प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर विचार करुन महानगरपालिका आयुक्त हे २५ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत निर्णय घेणार असून अंतिम आरक्षण २ डिसेंबर रोजी विहित नमुन्यात शासन राजपत्रात सादर करावे लागणार आहे.
अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीकरिता, नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाकरिता आरक्षित प्रभाग निश्चित कशा पध्दतीने करण्यात येणार आहे. याची माहिती सोलापूर महानगरपालिकेच्या https://www. solapurcorporation.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्दी करण्यात आलेली आहे, असे महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी म्हटले आहे.







