सोलापूर : आगामी सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना सोमवार, १५ डिसेंबर रोजी इच्छुकांचे अर्ज स्वीकारणार असून महानगरपालिका निवडणुका महायुतीमधूनच लढणार असल्याचे शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे आणि जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी रविवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत सांगितले.सोलापूर महापालिकेसाठी १०२ जागांसाठी तयारी करणार असून भाजपने शब्द दिल्याप्रमाणे मात्र बेस्ट २५ जागाच घेणार असल्याचेही डॉ. वाघमारे आणि जिल्हाप्रमुख शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
आगामी सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना मोठ्या जोमाने कामाला लागली आहे. ताकदीने शिवसेना निवडणूक लढणार आहे. राज्यपातळीवरून स्थानिक पातळीवर महायुती करण्यासाठी सांगण्यात आले आहे. सोलापुरात सेनेने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवारांना निवडून आणण्यासाठी जीवाचे रान केले आहे. त्यावेळचे भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी शिवसेनेला महापालिका निवडणुकीसाठी २५ जागासोडणार असल्याचा शब्द दिला होता.
तो शब्द त्यांना पाळावाच लागेल, असे जिल्हाप्रमुख शिंदे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला जिल्हाप्रमुख अमर पाटील, सचिन चव्हाण, तुकाराम मस्के, जयश्री पवार, मनिषा नलावडे, आश्विनी भोसले, पूजा चव्हाण, माधुरी कांबळे, सुनंदा साळुंखे, सागर शितोळे आदी उपस्थित होते.







