सोलापूर: सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ ची मतमोजणी दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजेपासून सुरू होणार आहे. ही प्रक्रिया शांततेत आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १६३ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.

महत्वाचे निर्बंध खालीलप्रमाणे आहेत:
१.) १०० मीटर परिसरात प्रवेशबंदी: मतमोजणी केंद्राच्या मुख्य इमारतीत आणि केंद्राच्या बाहेरील १०० मीटर परिसरात अनधिकृत व्यक्तींना प्रवेशास मनाई असेल. केवळ निवडणूक अधिकारी, कर्मचारी, उमेदवार, त्यांचे अधिकृत प्रतिनिधी आणि पासधारक व्यक्तींनाच प्रवेश दिला जाईल.
२. इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर बंदी: मतमोजणी केंद्राच्या आवारात मोबाईल फोन, टॅबलेट, संगणक किंवा संदेशाची देवाणघेवाण करणारी कोणतीही विद्युत उपकरणे आणणे, वापरणे किंवा हाताळण्यास सक्त मनाई आहे.
३. वस्तूंवर बंदी: केंद्रात आगपेटी, लायटर, ज्वालाग्राही पदार्थ किंवा कोणतेही घातक शस्त्र बाळगण्यास बंदी घालण्यात आली आहे.
४ ).वाहनांना प्रवेश: सोलापूर जिल्हा निवडणूक कार्यालय किंवा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अधिकृत परवान्याशिवाय कोणत्याही खासगी वाहनाला मतमोजणी केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही.
५.) माध्यम प्रतिनिधींसाठी सूचना: पत्रकार व माध्यम प्रतिनिधींना प्रत्यक्ष मतमोजणी कक्षामध्ये मोबाईल व कॅमेरा नेण्यास मनाई असेल.
महापालिका मतमोजणीची ठिकाणे
दयानंद कॉलेज, सोलापूर १, २, ३, ४
सिंहगड कॉलेज, सोलापूर ५, ६, ७, १५
ITI तंत्रनिकेतन अक्कलकोट रोड ८, ९, १४
कुचन हायस्कूल, सोलापूर १०, ११, १२, १३
मेहता प्राथमिक शाळा १६, १७, १८, २१
नू.म.वि , डफरीन चौक १९, २०, २५
एसआरपीएफ कॅम्प २२, २३, २४, २६
पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात येते की, निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी या आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
एम राजकुमार – पोलीस आयुक्त , सोलापूर शहर










