४ ते ७ जानेवारी दरम्यान महाराष्ट्रातील १७ विद्यापीठांतील एनएसएस स्वयंसेवकांचा सांस्कृतिक संगम!
सोलापूर : महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई, राष्ट्रीय सेवा योजना कक्ष आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने १६ वी राज्यस्तरीय सामाजिक व सांस्कृतिक स्पर्धा ‘उत्कर्ष २०२५–२६’ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा चार दिवसीय राज्यस्तरीय महोत्सव दि. ४ ते ७ जानेवारी २०२६ या कालावधीत सोलापूर विद्यापीठात होणार असल्याची माहिती कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी दिली.‘उत्कर्ष’ हा राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ देणारा, सामाजिक जाणीव जागवणारा आणि नेतृत्वगुण विकसित करणारा राज्यातील एक महत्त्वाचा उपक्रम मानला जातो.

महाराष्ट्रातील विविध १७ विद्यापीठांतील ३५० स्वयंसेवक या स्पर्धांमध्ये सहभागी होऊन आपली कला, विचारशक्ती व सामाजिक भान सादर करणार आहेत. या राज्यस्तरीय महोत्सवाचे उद्घाटन रविवार, दि. ४ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजता होणार आहे. उद्घाटक म्हणून पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे (बीजमाता), अहिल्यानगर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. महानवर हे असतील. याप्रसंगी एनएसएसचे राज्य संपर्क अधिकारी तथा विशेष कार्य अधिकारी डॉ. मिलिंद काळे, क्षेत्रीय संचालक (महाराष्ट्र व गोवा) डॉ. अजय बा. शिंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

तसेच प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, एनएसएसचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.या चार दिवसीय स्पर्धांचा पारितोषिक वितरण व समारोप समारंभ बुधवार, दि. ७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे. समारोप समारंभास लोककवी प्रा. प्रशांत मोरे, मुंबई हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून ते युवकांशी संवाद साधणार आहेत. ‘उत्कर्ष २०२५–२६’ या राज्यस्तरीय महोत्सवामुळे सोलापूर शहराला सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात राज्यपातळीवर विशेष ओळख मिळणार असून युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी हा उपक्रम दिशादर्शक ठरणार आहे. पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून या महोत्सवाची जोरदार तयारी करण्यात आली आहे. स्पर्धांच्या परीक्षणासाठी राज्यातील नामवंत परीक्षक असणार आहेत.

विविधांगी स्पर्धांचा समावेश
या राज्यस्तरीय उत्कर्ष महोत्सवामध्ये एकूण १४ स्पर्धा होणार आहेत. यामध्ये ४ जानेवारीला पहिल्या दिवशी पथसंचालन (शोभायात्रा) व उद्घाटन आणि संघ व्यवस्थापकांची बैठक होईल. ५ जानेवारीला दुसऱ्या दिवशी भारतीय लोककला यामध्ये पोवाडा, भारुड, भजन, कार्यप्रसिद्धी अहवाल प्रदर्शन, भारतीय लोकवाद्य, संकल्पना नृत्य, कवितांच्या स्पर्धा होतील. मंगळवार, ६ जानेवारी रोजी पथनाट्य, निबंध, समूहगीत, भित्तचित्र घोषवाक्य, वक्तृत्व स्पर्धा होतील. छायाचित्रण स्पर्धा, ललित कला तसेच सामाजिक विषयांवर आधारित सादरीकरणे अशा विविध स्पर्धांचा यात समावेश आहे. या माध्यमातून युवकांमध्ये सामाजिक प्रश्नांविषयी जागरूकता निर्माण होणार असून कला आणि समाज यांचा सुंदर संगम पाहायला मिळणार असल्याचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. राजेद्र वडजे यांनी सांगितले.










